अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात चाईल्ड लाइनने अल्पवयीन मुलीचा नियोजित विवाह थांबविला. याप्रकरणी मुलीचे पालक, नातेवाईक, नवरदेवाकडील मंडळीला शुक्रवारी स्थानिक पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून मुलगी सज्ञान झाल्यानंतरच लग्न लावण्याबाबत हमीपत्र लिहून घेण्यात आले. पोलीस सूत्रांनुसार, नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय मुलीचे लग्न लावले जाणार असल्याची माहिती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाईल्ड लाइन (टोल फ्री क्रमांक १०९८) अंतर्गत जनजागृती करणाऱ्या चमूतील शंकर वाघमारे व समुपदेशक अमित कपूर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून माहिती मिळाली.
शंकर वाघमारे व अमित कपूर यांनी प्रथम मुलगी ही अलवयीन असल्याचा पुरावा गोळा केला. तिचा जानेवारीमध्ये साखरपुडा झाला असून, लग्न लवकरच लागणार असल्याची माहिती मिळाल्याने चाईल्ड लाइन समन्वयक फाल्गुन पालकर यांनी महिला बाल विकास अधिकारी, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष (अमरावती) यांना पत्रव्यवहार करून प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्यामार्फत जिल्हा विशेष बाल पोलीस पथकाच्या पीएसआय वंजारी (अमरावती) व विशेष बाल पोलीस पथकाच्या पीएसआय द्वारका अंभोरे (नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाणे) यांच्याकडे ही सूचना गेली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी मुलीचे पालक, नातेवाइकांसह नियोजित वर व त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात आणून त्यांचा जबाब नोंदविला. मुलीचा विवाह ती १८ वर्षांची पूर्ण होईपर्यंत करू नये, अल्पवयात विवाह केल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी नोटीस त्यांना सीआरपीसी कलम १४९ अन्वये बजावली. ‘आम्ही मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतरच लग्न करू. त्यापूर्वी लग्न केल्यास पुढील कारवाईस पात्र राहील’ असे हमीपत्र पालकांनी लिहून दिले. चाईल्ड लाइनचे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, माधुरी चेंडके, संचालक सूर्यकांत पाटील, प्रशांत घुलक्षे, चमू सदस्य मीरा राजगुरे, विशेष बाल पोलीस पथकातील कुंदन राठोड, राजेश इरपाते, प्रशांत बेलोरकर, शीतल डवले आदींचे सहकार्य याप्रसंगी लाभले.
पोलिसांची राहणार नजर
सदर मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत चाइल्ड लाइन व नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याकडून वारंवार पाठपुरावा घेतला जाईल व देखरेख ठेवली जाईल, असे सांगण्यात आले.
चाईल्ड लाइनशी करा संपर्क
मुलांना कुठलीही समस्या भेडसावत असेल, मदत पाहिजे असल्यास १०९८ या नि:शुल्क चाईल्ड हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क करावा. संपर्क व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन चाईल्ड लाइनने केले आहे.