चांदूरच्या पोळ्याला स्वातंत्र्यपूर्व परंपरा

By Admin | Updated: August 24, 2014 23:13 IST2014-08-24T23:13:02+5:302014-08-24T23:13:02+5:30

जेथे हनुमानाचे मंदिर तेथे बैलांचा पोळा भरण्याची परंपरा चांदूरबाजार तालुक्यात अनादी काळापासून सुरू आहे. यांत्रिक शेतीने बैलाचे काम कमी केले असले तरी काही शेतकऱ्यांकडे आजही बैल आहेत.

Chandrubaan hymns pre-independence tradition | चांदूरच्या पोळ्याला स्वातंत्र्यपूर्व परंपरा

चांदूरच्या पोळ्याला स्वातंत्र्यपूर्व परंपरा

सुरेश सवळे - चांदूरबाजार
जेथे हनुमानाचे मंदिर तेथे बैलांचा पोळा भरण्याची परंपरा चांदूरबाजार तालुक्यात अनादी काळापासून सुरू आहे. यांत्रिक शेतीने बैलाचे काम कमी केले असले तरी काही शेतकऱ्यांकडे आजही बैल आहेत. पूर्वी पोळ्यात हजारो बैल जमायचे. कालांतराने त्यांची संख्या घटून शेकडोवर आली. काही गावात तर एखाद-दोन शेतकऱ्यांकडे बैलजोडी असल्यामुळे त्यांना पोळ्याच्या दिवशी हनुमान मंदिरात पूजेसाठी नेण्याचे सोपस्कार पाळले जाते. चांदूरबाजारात बैलांना पोळ्यातील घाट लावण्याचा मान येथील काकडे व राऊत पाटलांकडे वंश परंपरा चालत आलेली असून आजही ती कायम आहे.
चांदूरबाजारातील पोळा हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावातील हनुमान चौकातील हनुमान मंदिरालगत भरविला जातो. याठिकाणी पूर्वीपासूनच हनुमानाचे लहानसे देऊळ होते. त्या देवळाच्या परिसरात सर्व शेतकऱ्यांच्या बैलजोड्या गोळा व्हायच्या. यात पहिली जोडी नेमकी कोणी सोडायची यासाठी मानपानाचे मोठे महत्त्व होते. या मानासाठी पाटलाच्या दोन गटांत मारामाऱ्या झाल्याचाही अनुभव नामदेवराव राऊत या ७२ वर्षीय पोळ्याचा मान असलेल्या पाटलाने सांगितले. स्वातंत्र्यानंतर मात्र असा प्रसंग घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पोळ्याच्या पहिल्या दिवसाला ‘खालमानी’ म्हणून संबोधले जाते. या दिवशी शेतकऱ्यांकडून बैलजोडीची सेवा केली जाते. त्याच्या एका वर्षाच्या श्रमामुळे त्याच्या खांद्याला जे व्रण आले असतात त्यावर तूप लावून त्याची आंघोळ घातली जाते व त्याला पोळ्याच्या दिवशीची परंपरा हिन्दू-मुस्लीम सर्व जाती-धर्माच्या शेतकऱ्यांनी आजही टिकवून ठेवली आहे.
एकदा मोवाड वाहून अतिवृष्टीचा परिणाम पोळा भरण्यावर झाला. पोळ्यात बैलजोड्या सजवून आणले जाते. इतर ठिकाणी अशा सजवलेल्या बैलजोड्यांना सजावटीचा पुरस्कार दिला जातो. मात्र चांदूरबाजारात या उपक्रमाला मागील वर्षीपासून सुरुवात झाली. जय श्रीराम क्रीडा व्यायाम मंडळाव्दारा संचालित सियाराम हेल्थ क्लबतर्फे आकर्षक बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पोळ्यात अधिक संख्येने बैलजोड्या येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या क्लबचे अध्यक्ष गोपाल तिरमारे यांनी दिली.
यावर्षी या स्पर्धेतील उत्कृष्ट बैलजोडीला अनुक्रमे ३,२, २असे चांदिचे सिक्के नगराध्यक्ष शुभांगी देशमुख, नगरसेविका मीनाक्षी औतकर व बाबुराव काकडे यांच्यातर्फे देण्यात येणार असून बैलजोडीधारक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Web Title: Chandrubaan hymns pre-independence tradition