नगर परिषद कर्मचाऱ्यांचे भीख मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:15 IST2021-02-25T04:15:47+5:302021-02-25T04:15:47+5:30

तीन महिन्यांपासून वेतन नाही, उपाशीपोटी राबताहेत कर्मचारी परतवाडा : राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. ...

Begging agitation of city council employees | नगर परिषद कर्मचाऱ्यांचे भीख मांगो आंदोलन

नगर परिषद कर्मचाऱ्यांचे भीख मांगो आंदोलन

तीन महिन्यांपासून वेतन नाही, उपाशीपोटी राबताहेत कर्मचारी

परतवाडा : राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. काही नगर परिषदांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे हप्तेही भरले गेले नाहीत.

पगार पूर्ण व नियमित मिळावा, यांसह आपल्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या अनुषंगाने नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने १ मार्चला ढोल बजाव व भीख मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. तशा प्रकारचे निवेदन शासन व प्रशासन स्तरावर कर्मचारी संघटनांच्यावतीने देण्यात आले.

दरम्यान, राज्यातील नगर परिषद कर्मचारी, सफाई कामगार, पाणीपुरवठा व इतर कर्मचारी पगाराविना उपाशीपोटी कोविड-१९ सारख्या आजारातही रात्रंदिवस काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतानासह नियमित वेतन अदा करण्यासोबतच अन्य न्याय्य मागण्या पूर्णत्वास नेल्या नाही, तर १५ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

------------

अचलपूर नगरपालिका

अचलपूर नगर परिषद ही जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. या नगरपालिकेत तीनशेच्या वर कर्मचाऱ्यांचे आणि प्राथमिक शिक्षकांचे वेतन तीन महिन्यांपासून थकीत आहे. भविष्य निर्वाह निधीच्या हप्त्यापोटी कोट्यवधी रुपये नगरपालिकेने शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केलेले नाहीत.

-----------

नियमित मुख्याधिकारी नाही

अचलपूर नगरपालिका क्षेत्र कोरोना ‘हॉट स्पॉट’ बनले आहे. संचारबंदीसह लॉकडाऊन लागले आहे. यात उपाशीपोटी विनावेतन कर्मचारी, कोविड-१९च्या अनुषंगाने राबत आहेत. पण, या नगरपालिकेला नियमित मुख्याधिकारी नाही. नियमीत मुख्याधिकारी द्यावा व त्यांच्याकडे अन्य कुठलाही अतिरिक्त प्रभार नसावा, अशी मागणी आता जोर पकडून लागली आहे.

बॉक्स

८४ हजारांचा दंड

काेरोनाकाळात वेतनाविना असलेल्या अचलपूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी १७ फेब्रुवारीपासून ८४ हजारांचा दंड वसूल केला आहे. विनामास्क असलेल्या नागरिकांसह दुकानदारांवरही या पथकाने दंडात्मक कारवाई केली. यात महिला कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनिय आहे.

000000

Web Title: Begging agitation of city council employees