रेस्क्यू पथकावर मधमाशांचा हल्ला; एक गंभीर पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:21 AM2019-05-03T01:21:54+5:302019-05-03T01:22:46+5:30

येथील प्रसिद्ध भीमकुंड पॉइंटच्या दोन हजार फूट खोल दरीत मंगळवारी सकाळी ९.३० वाजता एका दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह काढण्यासाठी दरीत उतरलेल्या पथकावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला.

Bees attack on rescue team; One seriously injured five | रेस्क्यू पथकावर मधमाशांचा हल्ला; एक गंभीर पाच जखमी

रेस्क्यू पथकावर मधमाशांचा हल्ला; एक गंभीर पाच जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : येथील प्रसिद्ध भीमकुंड पॉइंटच्या दोन हजार फूट खोल दरीत मंगळवारी सकाळी ९.३० वाजता एका दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह काढण्यासाठी दरीत उतरलेल्या पथकावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला. त्यात एक जण गंभीर, तर पाच किरकोळ जखमी झाले. त्यांना रात्री दीड वाजता दुसऱ्या पथकाने दरीत उतरून बाहेर काढले.
मधमाशांच्या दंशाने दिलीप सावलकर (२५) हे गंभीर जखमी झाले असून, किरण कासदेकर (३०), मयूर सावलकर (२९), नितीन गुडियाला (३२), रामा धिकार (३०) व सुनील सावलकर (२२) अशी जखमींची नावे आहेत. नजीकच्या शहापूर येथील गणेश झगुजी हेकडे व राधा हेकडे या दाम्पत्याने कौटुंबिक कलहातून मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास भीमकुंड दरीत आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह काढण्यासाठी काही युवकांना पाठविण्यात आले होते. या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात आग्यामोह आहे.
मृतदेहापर्यंत काही युवक पोहोचले. दरीच्या वरच्या भागातून नेहमीप्रमाणे दोरखंड सोडण्यात आला. मात्र, अचानक मधमाशा चवताळल्या. त्यांनी मृतदेह काढण्यासाठी गेलेल्या पथकाला चावा घ्यायला सुरुवात केली. त्यातील काही जण जंगलात सैरावैरा पळत सुटले, तर दिलीप सावलकर याला मधमाशांनी मोठ्या प्रमाणात दंश केल्याने तो बेशुद्ध अवस्थेत तेथून पडून राहिला.

पोलिसांची रेस्क्यू टीम फेल
अमरावती येथील पोलिसांच्या रेस्क्यू टीममधील बाबूलाल पटेल, उईके मेजर आदी कर्मचाऱ्यांचे पथक गुरुवारी दरीत उतरले होते. या पथकाने विशेष परिधान केले होते. तरीसुद्धा मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे हे पथकसुद्धा गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दरीतून मृतदेहाविना परतले. आता घटनेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी नागपूर किंवा इतर विशेष पथकाला पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती चिखलदरा पोलिसांनी दिली.

रात्री दीड वाजता काढले दरीबाहेर
दोन हजार फूट खोल दरीत पाच ते सहा जणांना जावे लागते. मधमाशांनी पथकावर हल्ला केल्यानंतर सैरावैरा पळत सुटलेले काही जण परत खोऱ्यातून वर आले. मात्र, दिलीप गंभीर जखमी झाल्याने तो जागेवरच बेशुद्ध अवस्थेत पडून होता. रात्री ठाणेदार आकाश शिंदे व नगरसेवक अरुण तायडे यांनी इतर गावकरी व सहकाऱ्याच्या मदतीने इमर्जन्सी लाइट लावून सर्च आॅपरेशन राबविले व रात्री दीड वाजता आठ जणांच्या चमूने जाऊन खोऱ्यात अडकलेल्या दिलीपसह अन्य काहींना बाहेर काढले. त्यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली.

मृतदेहाचे गाठोडे बांधूनच
स्थानिक रहिवाशांच्या पथकाने बुधवारी दोन्ही मृतदेह एका पोत्यात बांधून ठेवले होते. दोरखंडाच्या साह्याने वर ओढण्यापूर्वी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. दुसरीकडे मोथा व शहापूर येथील नातेवाइकांना मृतदेहाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Bees attack on rescue team; One seriously injured five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.