आता घरी थांबूनच जमा करता येईल टॅक्सची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 10:26 AM2020-04-07T10:26:18+5:302020-04-07T10:26:26+5:30

वसुली लिपिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tax dues can now be pay from home | आता घरी थांबूनच जमा करता येईल टॅक्सची थकबाकी

आता घरी थांबूनच जमा करता येईल टॅक्सची थकबाकी

Next

अकोला : संसर्गजन्य कोरोन विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी येत्या १४ एप्रिलपर्यंत सर्वत्र ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला आहे. याचा परिणाम मनपाच्या मालमत्ता कर वसुलीवर झाला असून, शहरातील धनाढ्य नागरिकांनीही कर जमा करण्यास हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी घरी थांबूनच अकोलेकरांना मालमत्ता कराची थकबाकी जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी टॅक्स पावतीवर असलेल्या वसुली लिपिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेकडे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने प्रशासनाची सर्वाधिक भिस्त मालमत्ता कर वसुलीवर राहते. २०१६ पर्यंत शहरातील मालमत्ताधारकांकडून प्रशासनाला जमतेम १८ कोटी रुपयांचा कर प्राप्त होत असे. उत्पन्न नगण्य असल्याने मनपा कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या पाचवीला पुजलेली होती. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांकडूनही वारंवार कामबंद आंदोलने छेडल्या जात असल्याचे चित्र होते. शहरातील मालमत्तांचे दर तीन वर्षांनंतर पुनर्मूल्यांकन होणे क्रमप्राप्त असताना १९९८ पासून ही प्रक्रिया ठप्प पडली होती. २०१६ मध्ये मालमत्ता पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेत सुधारित करवाढ लागू केली. त्यानुसार मनपाला वार्षिक ६८ ते ७० कोटींचे उत्पन्न प्राप्त होईल, असा प्रशासनाला अंदाज होता. त्यानुसार कर वसुली होत असल्यानेच मागील तीन वर्षांमध्ये थकीत वेतनाची समस्या निकाली निघाली. यंदा चालू आर्थिक वर्षात मार्च संपेपर्यंत प्रशासनाला १३५ कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी मनपाने केवळ ४० कोटी रुपये वसूल केले. उर्वरित थकबाकीचा आकडा मोठा असताना ऐन कोरोना साथीच्या आजाराची सबब पुढे करून अकोलेकरांनी थकबाकी जमा करण्यास हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे.


घरोघरी जाऊन होणार थकबाकी वसूल
मध्यंतरी शहरात परदेशातून तसेच मोठ्या शहरातून दाखल झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी कर वसुली विभागातील सहायक कर अधीक्षक, वसुली लिपिकांसह शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य निरीक्षकांची फौज कामाला लावली होती. सर्वेक्षणाची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यादरम्यान, नागरिकांनी कर जमा करण्यास हात आखडता घेतल्याने नागरिकांच्या घरोघरी जाऊन थकबाकी वसूल करण्यासाठी कर वसुली लिपिकांना पाठविण्याचे नियोजन केल्या जात असल्याची माहिती आहे.


संसर्गजन्य कोरोना विषाणूची आपत्ती टाळण्यासाठी मनपाच्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रामुख्याने मनपाचे सफाई कर्मचारी, वैद्यकीय आरोग्य यंत्रणा तसेच इतर विभागातील कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत. अशा संकट समयी अकोलेकरांनी मालमत्ता कराची रक्कम
जमा करून त्यांचे कर्तव्य निभावण्याची गरज आहे.
- संजय कापडणीस आयुक्त, मनपा

 

Web Title: Tax dues can now be pay from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.