धिंग्रा चौकात‘ शिवसंग्राम’चा रास्ता रोको

By Admin | Updated: May 25, 2015 02:13 IST2015-05-25T02:13:56+5:302015-05-25T02:13:56+5:30

शेतकरी आत्महत्या प्रकरण; महावितरणच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

Stop the path of 'Shiv Sangram' in Dhingra Chowk | धिंग्रा चौकात‘ शिवसंग्राम’चा रास्ता रोको

धिंग्रा चौकात‘ शिवसंग्राम’चा रास्ता रोको

अकोला: महावितरणच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शेतकर्‍याने विष घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी संबंधित अभियंता संदीप घोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत शिवसंग्राम संघटनेच्यावतीने रविवारी अकोल्यातील धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. वीज जोडणी मिळत नसल्याने, चार दिवसांपूर्वी तळेगाव बाजार येथील शेतकरी विनोद रामदास खारोडे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर महावितरणने केलेल्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या साहाय्यक अभियंता घोडे यांना निलंबित केले असून, अन्य एका अभियंत्याची तालुक्यातून बदली करण्यात आली. परंतु या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ सुरू करण्यात आली आहे. मृतक शेतकरी विनोद खारोडे यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आत्महत्या का केली, याबाबतचे कारण स्पष्ट केले असून, महावितरणच्या हिवरखेड येथील कार्यालयात जाऊन, त्यांनी विष प्राशन केले व तेथूनच याबाबतची माहिती आपल्या आप्तांना दिली. यासंदर्भात पुरावे उपलब्ध असताना हिवरखेड पोलिसांनी मात्र अद्यापपर्यंंत बघ्याची भूमिका घेतली असल्याने, पोलिसांच्या या भूमिकेविरुद्ध व संबंधित अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शिवसंग्रामचे विभागीय अध्यक्ष शिवा मोहोड, जिल्हाध्यक्ष नानासाहेब भिसे यांच्या नेतृत्वात शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर शिवसंग्रामच्यावतीने आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Stop the path of 'Shiv Sangram' in Dhingra Chowk