गेज परिवर्तनाचे कार्य सुरू करून विकास कामांना गती द्यावी

By Admin | Updated: June 17, 2014 20:54 IST2014-06-16T23:12:43+5:302014-06-17T20:54:12+5:30

अकोला ते इंदौरदरम्यानच्या भागाचे लवकरात लवकर गेज परिवर्तन करून विकास कामांना गती देण्याची मागणी खासदार संजय धोत्रे यांनी केली.

Speed ​​up development work by starting the gauge conversion work | गेज परिवर्तनाचे कार्य सुरू करून विकास कामांना गती द्यावी

गेज परिवर्तनाचे कार्य सुरू करून विकास कामांना गती द्यावी

अकोला : ९0 वर्षांपूर्वी सर्वाधिक लांबीचा म्हणून परिचित असलेल्या देशातील १0 राज्यांना जोडणार्‍या रेल्वे मार्गाच्या अकोला ते इंदौरदरम्यानच्या भागाचे लवकरात लवकर गेज परिवर्तन करून विकास कामांना गती देण्याची मागणी खासदार संजय धोत्रे यांनी नुकतीच रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या भेटीदरम्यान केली.
गेल्या अनेक वर्षांपासून अकोला-खंडवा या मीटरगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यास राज्य सरकार उदासीन असून, वन विभागाची अडचण दूर करून सोनाळा मार्गे १८२ कि.मी. च्या नवीन प्रस्तावित रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी अपेक्षित असलेल्या १८00 कोटी निधीची तरतूद बजेटमध्ये करण्याची मागणी खा. संजय धोत्रे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली. कमीत कमी वेळेत दहा राज्यांना जोडणार्‍या या मार्गावरील अकोला ते आकोट, आकोट ते आमला खु. व आमला खु. ते खंडवा या तीन टप्प्यातील रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन झाल्यास आकोट, तेल्हारा, सोनाळा, जळगाव जामोद, शेगाव या परिसरातील नागरिकांनाच नव्हे, तर व्यापारी वर्गालादेखील फायदा होणार आहे. याबाबत त्वरित निर्देश देण्याची मागणी खा. धोत्रे यांनी सदानंद गौडा यांच्याकडे केली.
तसेच शेगाव व मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांना थांबा द्यावा, तसेच सिकंदराबाद - बिकानेर, चेन्नई-जोधपूर या गाड्या कायमस्वरूपी सुरू कराव्या, पुण्यासाठी आणि बंगलोरसाठी आणखी गाड्या सुरू कराव्या, अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस अकोल्यावरून सुरू करावी या मागण्यांसह प्लॅटफार्म क्रमांक ६ व ७ चे पुनर्निर्माण करून टिनशेड लावण्याची मागणी खा. धोत्रे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. यावेळी त्यांच्यासोबत खंडव्याचे खासदार नंदकुमार चव्हाण उपस्थित होते. 

Web Title: Speed ​​up development work by starting the gauge conversion work