सोनसाखळी चोरीच्या प्रकरणास कलाटणी

By Admin | Updated: June 10, 2014 14:17 IST2014-06-10T14:17:34+5:302014-06-10T14:17:51+5:30

महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी पळविताना नागरिकांनी रंगेहाथ पकडून मार खाणार्‍या आणि त्यानंतर रात्रभर पोलिस स्टेशनमध्ये घालवाव्या लागणार्‍या एका पोलिस निरीक्षक पुत्राच्या प्रकरणाची माहिती काही औरच निघाली.

Sonatakalal refuses to stolen case | सोनसाखळी चोरीच्या प्रकरणास कलाटणी

सोनसाखळी चोरीच्या प्रकरणास कलाटणी

 

पोलिस निरीक्षक पुत्राची सुटका

अकोला - महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी पळविताना नागरिकांनी रंगेहाथ पकडलेल्या, पकडल्यानंतर नागरिकांचा बेदम मार खाणार्‍या आणि त्यानंतर रात्रभर पोलिस स्टेशनमध्ये घालवाव्या लागणार्‍या नागपूर येथील एका पोलिस निरीक्षक पुत्राच्या प्रकरणाची माहिती सोमवारी काही औरच निघाली. सोनसाखळी चोरीचा कोणताही प्रयत्न या पोलिस पुत्राकडून झालाच नाही. तो केवळ एक अपघात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली असून, याप्रकरणी कोणतीही तक्रार झाली नसल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.
नागपूर येथील पोलिस निरीक्षक बाबुसिंह राठोड यांचा मुलगा प्रशांत याला रविवारी रात्री नागरिकांनी पकडून, खदान पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आळशी प्लॉट भागातील एक महिला पायी जात असताना, तिच्या गळय़ातील सोनसाखळी लंपास करण्याचा त्याने प्रयत्न केला होता, असे या नागरिकांचे म्हणणे होते. या नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा रविवारी रात्री त्याच्या मित्रासोबत नेहरू पार्क चौकानजीक असलेल्या एनसीसी कार्यालयासमोर उभा होता. त्यावेळी आळशी प्लॉट भागातील एक महिला तिच्या घराकडे पायी जात होती. प्रशांत व त्याच्या मित्राने त्या महिलेच्या गळयातील सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र रात्रीचा फेरफटका मारण्यासाठी आलेल्या परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडून चांगलेच बदडले. त्यानंतर प्रशांतला खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी रात्री एक वाजतापासून सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत प्रशांत खदान पोलिसांच्या ताब्यात होता. सोमवारी दुपारी त्याला सोडून देण्यात आले.प्रशांतने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो दुचाकी घेऊन त्या महिलेच्या अंगावर पडला. त्यामुळे महिलेची सोनसाखळी आपल्या हातात आली. त्याचे म्हणणे खदान पोलिसांनी ग्राह्य धरले. याशिवाय संबंधित महिलेनेही तक्रार दिली नसल्याने त्याला सोडून देण्यात आले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Sonatakalal refuses to stolen case