अकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:16 IST2021-01-18T04:16:25+5:302021-01-18T04:16:25+5:30

अकोला : कोविड लसीकरणाला जिल्ह्यात सकारात्मक वातावरणात सुरुवात झाली, मात्र लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी दोन महिला कर्मचाऱ्यांची ...

Reaction of both after vaccination in Akola! | अकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन!

अकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन!

अकोला : कोविड लसीकरणाला जिल्ह्यात सकारात्मक वातावरणात सुरुवात झाली, मात्र लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी दोन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. लसीकरणानंतर ही लक्षणे सामान्य असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात शनिवारी कोविड लसीकरण यशस्वीपणे पार पडले. पहिल्यांदाच कोविडची लस घेणार असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये धाकधुकीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच सर्वांनी न घाबरता लस घेतली. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर सर्वकाही सुरळीत होते. मात्र, लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी दोन महिला कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली. यातील एका महिला वैद्यकीय कर्मचारी असून, त्यांना थंडी वाजून ताप आला तर दुसरी महिला आशा सेविका असून, त्यांना थकवा आल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांनाही तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही महिला कर्मचारी ३० ते ३४ वर्ष वयोगटातील असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांचे म्हणणे आहे.

इतरही लोकांना ‘रिॲक्शन’

या दोन महिला कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ज्या लाभार्थ्यांनी लस घेतली, अशा आणखी काहींना रविवारी लसीची रिॲक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय सुत्रांच्या मते लस घेणाऱ्या व्यक्तींना हलका ताप, अंगदुखी, लस घेतलेल्या जागी दुखणे अशी सौम्य लक्षणे आढळून आली. या प्रकारची सौम्य लक्षणे येणे साहजिक असून, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

Web Title: Reaction of both after vaccination in Akola!