नाला सफाई नाहीच; देयकासाठी पुंड सरसावले

By Admin | Updated: July 15, 2015 01:31 IST2015-07-15T01:31:53+5:302015-07-15T01:31:53+5:30

भाजप नगरसेवकाच्या तक्रारीला ठेंगा.

No drainage cleaning; Due to the payment | नाला सफाई नाहीच; देयकासाठी पुंड सरसावले

नाला सफाई नाहीच; देयकासाठी पुंड सरसावले

अकोला : मान्सूनपूर्व नाला सफाई कागदोपत्री दाखवून महापालिकेची तिजोरी खाली करण्याचा एकमेव उद्योग संबंधित अधिकार्‍यांनी चालवल्याचे वारंवार समोर येत असताना प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी तोंडावर बोट ठेवणे पसंत केले आहे. प्रभागात मोठय़ा नाल्यांची साफसफाई न करता सहायक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड देयक काढण्यासाठी सरसावल्याचा आरोप भाजप नगरसेवक बाळ टाले यांनी केला. नाला सफाई न करता थेट देयक अदा होत असल्याचा गंभीर मुद्यावर नगरसेवक टाले यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. मनपा प्रशासनाने एप्रिल किंवा मे महिन्यात मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई करणे अपेक्षित होते. तसे न करता प्रशासनाने जून महिन्यात नाला सफाईची निविदा प्रकाशित केली. नाला स्वच्छतेचे अर्धेअधिक काम पावसामुळे होणार असल्याचे हेरत स्वच्छता विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड यांनी नाला सफाईच्या निविदेची फाईल तयार केली. मनपाकडून पहिल्यांदाच प्रभागनिहाय नाला सफाई होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. सद्य:स्थितीत नेमक्या कोणत्या प्रभागात नाला सफाई करण्यात आली, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. स्वच्छता व आरोग्य विभागाचे नियंत्रण अधिकारी असलेल्या प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने व चारही झोन अधिकार्‍यांना नाला सफाईच्या प्रक्रियेतून पद्धतशीर बाजूला सारण्यात आले. यादरम्यान, नाला सफाईमध्ये मोठय़ा नाल्यांचा समावेश न करता स्वच्छता निरीक्षकांनी अक्षरश: सहा इंच रुंदीच्या नाल्यांचा समावेश केला. प्रभाग क्र.३१ मधील भाजप नगरसेवक बाळ टाले यांच्या प्रभागातील चक्क लहान नाल्यांची निविदा काढण्यात आली. प्रभागात मोठे नाले घाणीने गच्च भरले असून, प्रशासनाने एकही नाला साफ केला नाही. तरीदेखील सहायक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड देयकं काढण्याच्या तयारीत असल्याचा आरोप नगरसेवक टाले यांनी केला.

Web Title: No drainage cleaning; Due to the payment