मनपात उद्या स्थगित सभा

By Admin | Updated: July 15, 2015 01:33 IST2015-07-15T01:33:57+5:302015-07-15T01:33:57+5:30

महापालिकेच्या स्थगित सर्वसाधारण सभेचे १६ जुलै रोजी मुख्य सभागृहात सकाळी ११.३0 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

Mentor tomorrow's adjourned meeting | मनपात उद्या स्थगित सभा

मनपात उद्या स्थगित सभा

अकोला: महापालिकेच्या स्थगित सर्वसाधारण सभेचे १६ जुलै रोजी मुख्य सभागृहात सकाळी ११.३0 वाजता आयोजन करण्यात आले आहे. सभेतील महत्त्वपूर्ण विषय निकाली काढल्या जातील, अशी अपेक्षा आहे. मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनासाठी जीआयएस प्रणाली कार्यान्वित करणे, शहर बस सेवा सुरू करणे, सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या निविदेला मंजुरी देण्यासह महान ते मोर्णा प्रकल्पापर्यंंंत जलवाहिनी टाकण्याच्या महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यासाठी महापौर उज्ज्वला देशमुख यांनी २७ मे रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभागृहात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि भारिप-बमसंचे मिळून अवघे १४ नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांची पुरेशी संख्या नसल्याने सभेचे कामकाज होऊ शकत नसल्याचा मुद्दा ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी उपस्थित केला होता. त्यावर महापौर उज्ज्वला देशमुख यांनी अवघ्या दहा मिनिटात ही सभा स्थगित केली होती. सभेतील महत्त्वपूर्ण विषय रखडल्यामुळे विकास कामे ठप्प झाली. भाजपमधील अंतर्गत वादात शहर विकासाचे तीन तेरा वाजत असल्याने पक्षाची नाहक बदनामी होत असल्याचे पक्ष श्रेष्ठींच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून समन्वय समितीचे गठन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत स्थगित सभेचे पुन्हा आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अधिकारी सापडणार अडचणीत नगरसेवकांना विश्‍वासात न घेता परस्पर नाला सफाईच्या निविदा काढणे, नाला सफाई न करता देयके अदा करणे, नागपूर हायकोर्टाचे आदेश पायदळी तुडवित कत्तलखाना सुरू करण्यास परवानगी देणे, निलंबित शिक्षणाधिकारी सुलताना यांची चौकशी न करताच त्यांचे निलंबन आदेश रद्द करणे, शालेय पोषण आहार वाटप प्रक्रियेत घोळ करणे, कर्मचार्‍यांचे नाहक निलंबन करणे, स्थानिक अधिकार्‍यांना अपमानास्पद वागणूक देणे आदी मुद्यांवर सभागृहात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कर्तव्यदक्षतेचा टेंभा मिरवणार्‍या अधिकार्‍यांच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत आहेत.

Web Title: Mentor tomorrow's adjourned meeting