निविष्ठा विक्रीत अनियमितता; तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, पाच केंद्रांना नोटीसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:50 IST2026-04-30T13:49:43+5:302026-04-30T13:50:54+5:30
कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळल्याने जिल्ह्यात तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, इतर पाच केंद्रांना नोटिसा बजावत त्रुटीबाबत ताकीद देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी (एसएओ) बुधवार ३० एप्रिल रोजी दिला.

निविष्ठा विक्रीत अनियमितता; तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, पाच केंद्रांना नोटीसा
अकोला : कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळल्याने जिल्ह्यात तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, इतर पाच केंद्रांना नोटिसा बजावत त्रुटीबाबत ताकीद देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी (एसएओ) बुधवार ३० एप्रिल रोजी दिला.
येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या खरेदी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या तपासणीत निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळलेल्या जिल्ह्यातील आठ कृषी सेवा केंद्रांची सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याने अकोट येथील अकोट जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी फॅक्टरी लि. २ महिने, चोहोट्टा बाजार येथील जयेश ॲग्रो सेंटर २ महिने आणि पातुर तालुक्यातील आलेगाव येथील तायडे ॲग्रो सेंटरचा परवाना १ महिन्याच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी दिला.
तपासणीत आठ केंद्रांत आढळल्या नियमबाह्य बाबी
कृषी विभागाच्या जिल्हा आणि तालुकास्तरीय भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रांची अचानक तपासणी केली होती. या तपासणीत आठ कृषी सेवा केंद्रांमध्ये नियमबाह्य बाबी आढळून आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नोंदणी प्रमाणपत्र ग्राहकास दिसेल असे न लावणे, गोदामातील प्रत्यक्ष साठा आणि मशीनवरील साठ्यामध्ये मोठी तफावत असणे, शेतकऱ्यांना अधिकृत पक्के बिल (पावती) न देणे, साठा फलक आणि दर फलक अद्ययावत न ठेवणे या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित आठ कृषी सेवा केंद्रचालकांची जिल्हा स्तरावर सुनावणी घेण्यात आली. त्यात तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
विक्रेत्यांनी काळाबाजार करू नये; कृषी विभागाचा इशारा
येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारचा काळाबाजार किंवा 'लिंकिंग' करू नये, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना अशी घ्यावी काळजी
शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्यांच्या निविष्ठांना प्राधान्य द्यावे, खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे, बिलावर लॉट नंबर आणि किंमत तपासून घ्यावी, असे आवाहन असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.