पातूरचे नायब तहसीलदार सय्यद एहसानोद्दीन मंगळवारी २६ जानेवारी रोजी खेट्री, पिंपळखुटा, पहाडसिंगी, शिरपूर, चांगेफळ, परिसरात गस्तीवर असताना चतारी परिसरात मुरुमाने भरलेला ट्रॅक्टर आढळून आला होता, ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. नायब तहसीलदार यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करून पकडले, सदर ट्रॅक्टर मालकावर दंडात्मक कारवाई होईपर्यंत ट्रॅक्टर चान्नी पोलिसांच्या ताब्यात दिला होता. तसेच चतारी परिसरातील गेल्या काही दिवसांपासून शासकीय जागेतून जेसीबी मशीनद्वारे मुरुमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक सर्रास सुरु असल्याबाबतचे वृत्त लोकमतने २८ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच संबंधित महसूल विभाग खडबडून जागा झाला आणि २८ जानेवारी रोजी तहसीलदार दीपक बाजड यांच्या आदेशानुसार सस्ती मंडळाचे प्रभारी मंडळ अधिकारी व चतारी, खेट्रीचे तलाठी आर. एस. पवार यांनी २८ जानेवारी रोजी जेसीबी मशीनद्वारे मुरूमाचे उत्खनन झाल्याच्या ठिकाणाची पाहणी केली असता, चक्क ७० ब्रास मुरुमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक केल्याचे समोर आले, त्यामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
कारवाई करण्याचे महसूल विभागासमोर आव्हान
चतारी परिसरातील शासकीय जागेतून ७० ब्रास मुरुमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक करण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. उत्खनन व वाहतूक कोणी केली,याची चौकशी करून कारवाई करण्याचे आव्हान महसूल विभागासमोर आहे.