कुरीयरने आलेले ६0 लाखांचे सोने लुटले

By Admin | Updated: March 3, 2015 23:39 IST2015-03-03T23:39:23+5:302015-03-03T23:39:23+5:30

अकोल्यातील घटना, चाकुच्या धाकावर लुटले सोने.

Gold worth Rs 60 lakh was found in Kurien's house | कुरीयरने आलेले ६0 लाखांचे सोने लुटले

कुरीयरने आलेले ६0 लाखांचे सोने लुटले

अकोला: मुंबईहून अकोल्यात आलेले अडीच किलो सोन्याचे पार्सल सायकलवर घेऊन जाणार्‍या एका कुरियर कंपनीच्या नोकराला चाकूचा धाक दाखवून, ६0 लाखाचे सोने लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.३0 वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील भागवतवाडीसमोर घडली.
अकोला शहरातील अनिकट भागात राहणारे प्रकाश जगन्नाथ खानेवाले(५५) हे प्रशांत शाह यांच्या कुरीयर सव्र्हीस कंपनीमध्ये काम करतात. मंगळवारी पहाटे विदर्भ एक्सप्रेसने अकोल्यातील पाच ते सहा सराफा व्यावसायिकांचे अडीच किलो सोने मुंबईहून येणार होते. हे सोने रेल्वेने मुंबईहून आणण्याची जबाबदारी दिनेश विश्‍वनाथ महल्ले यांची होती. त्यांच्याकडून सोने आणण्यासाठी प्रकाश खानेवाले पहाटे सायकलने रेल्वे स्टेशनवर गेले. त्यांनी दिनेश महल्ले यांच्याकडून अडीच किलो सोन्याचे पार्सल घेतले आणि पिशवीमध्ये ठेऊन सायकलने ते प्रशांत शाह यांच्या घरी जाण्यासाठी निघाले. रेल्वे स्टेशन रोडवरील भागवतवाडीजवळ आल्यानंतर, मागून विनाक्रमांकाच्या काळय़ा रंगाच्या मोटारसायकलवर दोन युवक आले. त्यांनी तोंडाला कापड बांधले होते. त्यांनी खानेवाले यांना अडवून त्यांना चाकूचा धाक दाखविला. त्यांच्याजवळील सोन्याची पार्सलची पिशवी घेऊन ते पसार झाले. याप्रकारामूळे घाबरलेल्या खानेवाले यांनी या घटनेची माहिती मालकाला दिली. त्यानंतर दोघांनीही रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकाश खानेवाले यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भादंवि कलम ३९२(३४) अन्वये गुन्हा दाखल केला.
*आरोपींच्या शोधासाठी दोन पथके
सोने लूटल्याच्या या घटनेने सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, इतर पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकांनाही तपासकामी लावले. दोन पथकं जिल्हय़ात व जिल्हय़ाबाहेर पाठविण्यात आली.
*आयजींना सलामी
रामदासपेठ पोलीस ठाण्याचे वार्षीक निरीक्षण असल्याने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे अकोल्याच्या दौर्‍यावर आले आहेत. अकोला दौर्‍यावर पहिल्यांदाच आलेल्या आयजींना चोरांनी ६0 लाखांचे सोने लूटून सलामी दिली.

Web Title: Gold worth Rs 60 lakh was found in Kurien's house