अकोला जिल्हय़ात डायरियाचा उद्रेक

By Admin | Updated: January 21, 2015 01:12 IST2015-01-21T01:12:35+5:302015-01-21T01:12:35+5:30

बहुतांश गावांत दूषित पाणीपुरवठा, रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी.

Diarrhea outbreak in Akola district | अकोला जिल्हय़ात डायरियाचा उद्रेक

अकोला जिल्हय़ात डायरियाचा उद्रेक

सचिन राऊत /अकोला:
वातावरणातील गारवा, अधून-मधून ढगाळ वातावरण, कडाक्याची थंडी अन् दूषित पाण्यासोबतच अस्वच्छतेमुळे जिवाणू, विषाणू आणि जंतांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. हवामानातील बदलामुळे जिल्ह्यात डायरियासह विविध साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाउसफुल्ल झाली आहेत.
अनेक गावांत डायरियाचा उद्रेक झाला असून, विषाणू, जिवाणू आणि जंतांमुळे अनेक रुग्ण या आजाराच्या कचाट्यात सापडले आहेत. या रुग्णांना हगवण, उलट्या व पोट दुखण्यासोबतच जलशुष्कतेचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठय़ामुळे साथीच्या आजारांचा प्रकोप झाला आहे. सवरेपचार रुग्णालयामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचारासाठी दाखल असून, खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. यामध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, मलेरिया व डायरियाची लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील आठ दिवसांपासून वातावरणामध्ये बदल सुरू असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. नाल्यांची साफसफाई होत नसून, अनेक गावांत व शहराच्या काही भागात घाणीमुळे साथरोगांना आमंत्रण मिळत आहे. घाण पाण्यामध्ये एडीस इजिप्टाय डासांची उत्पत्ती होत असून, यापासून डायरिया, डेंगी ताप, मलेरिया, सर्दी, ताप, डोकेदुखी, डेंगी हिमोरेजिक फीव्हर, डेंगी शॉक सिंड्रोम या आजारांनी रुग्णांना घेरले आहे. डायरियाचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णांना जलशुष्कतेचा त्रास जाणवत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.

Web Title: Diarrhea outbreak in Akola district