चार शहरांतील हॉटेलचे नोंदणी बुक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 02:42 IST2016-12-25T02:42:54+5:302016-12-25T02:42:54+5:30

खेळाडूंचे लैंगिक शोषण प्रकरण.

Book registration of four city hotels confiscated | चार शहरांतील हॉटेलचे नोंदणी बुक जप्त

चार शहरांतील हॉटेलचे नोंदणी बुक जप्त

अकोला, दि. २४-वसंत देसाई क्रीडांगणावरील अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनचा सचिव तथा प्रशिक्षक मुकेश तुंडलायतला घेऊन अकोला पोलीस पुणे, अमरावती, परभणी आणि नांदेड येथे गेले होते. सदर चार शहरांमध्ये तुंडलायत याने ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केला, त्या ठिकाणचे नोंदणी बुक पोलिसांनी जप्त केले असून, हे पथक शनिवारी परतले. जिम्नॅस्टिक प्रशिक्षक मुकेश तुंडलायत याने एका १६ वर्षीय खेळाडूचे सतत लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण मंगळवार, १३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर प्रकरणातील संवेदनशीलता लक्षात घेऊन मोठी गोपनीयता बाळगत जिल्हाधिकारी यांनी स्वत:च्या अँन्टी चेंबरमध्ये पीडित खेळाडूचे बयाण नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली. याच ठिकाणी आरोपी तुंडलायत याला बोलावून अटक करण्यात आली. त्यानंतर तुंडलायत पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत असताना आणखी एका खेळाडूने लैंगिक छळाची तक्रार केली. यावरून पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल करून त्याला पुन्हा अटक केली. मुकेश तुंडलायतला घेऊन अकोला पोलीस परभणी, पुणे, नांदेड आणि अमरावती येथे गेले. क्रीडा स्पर्धांनिमित्त त्याने या चारही शहरांतील हॉटेलमध्ये या खेळाडूंचे लैंगिक शोषण केले असून, त्याने या शहरात किती दिवस मुक्काम केला, याची माहिती घेऊन संबंधित हॉटेलचे नोंदणी बुक जप्त केले. त्यानंतर पोलिसांचे पथक तुंडलायतला घेऊन शनिवारी अकोल्यात दाखल झाले आहेत.

Web Title: Book registration of four city hotels confiscated