E-Challan चा WhatsApp मेसेज पडू शकतो महागात; एका लिंकमुळे लोकांची बँक खाती होतायत 'साफ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:04 IST2026-01-07T14:58:02+5:302026-01-07T15:04:48+5:30
अकोला : ‘तुमच्या गाडीचे चालान भरा’ असा मेसेज किंवा ॲप लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी नवा प्रकार ...

E-Challan चा WhatsApp मेसेज पडू शकतो महागात; एका लिंकमुळे लोकांची बँक खाती होतायत 'साफ'
अकोला : ‘तुमच्या गाडीचे चालान भरा’ असा मेसेज किंवा ॲप लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी नवा प्रकार सुरू केला असून, ई-चालानाच्या नावाखाली पाठवण्यात येणारी एपीके फाइल मोबाइल हॅक करत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. शहरात अशा १० ते १२ घटना घडल्या आहेत. गाडीचे चालान भरा, असा मेसेज आला, तो संबंधितांनी ओपन केल्यानंतर चालान आले आहे का, दंड किती आहे?, याची माहिती पाहण्यासाठी त्यांनी सदर फाइल उघडली.
मात्र, ती फाइल ओपन करताच मोबाइलमध्ये परस्पर तीन संशयास्पद ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल झाली आणि काही क्षणातच मोबाइलचा संपूर्ण ताबा सायबर भामट्यांनी घेतला. अशा प्रकारातून २ हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत पैसे बँकेतून गायब झाले आहेत. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सायबर सेफ्टी : स्वत:ला कसे सुरक्षित ठेवाल?
० फक्त अधिकृत ॲप्सच डाउनलोड करा - गुगल प्ले स्टोअर किंवा अधिकृत सरकारी संकेतस्थळाशिवाय कुठलेही ॲप इन्स्टॉल करू नका.
० ई-चालानची खात्री करा - ई-चालानची माहिती फक्त परिवहन, महा ट्रॅफिक किंवा अधिकृत एसएमएसद्वारेच तपासा.
० अनोळखी लिंक/फाइल उघडण्यापूर्वी विचार करा - एपीके, पीडीएफ, झिप अशा फाइल्स संशयास्पद असू शकतात.
० दोन स्तरांची सुरक्षा वापरा - व्हॉट्सॲप, ई-मेल, बँकिंग ॲप्ससाठी दोन टप्प्यांची सुरक्षा सुरू ठेवा.
सुरक्षेसाठी या गोष्टी टाळा
० व्हॉट्सॲप/टेलिग्रामवर आलेल्या एपीके फाइल्स उघडू नका.
० ‘तुमचे चालान भरा’ असा घाईचा मेसेज आल्यास लगेच प्रतिसाद देऊ नका.
० ओटीपी, बँक तपशील, यूपीआय पिन कोणालाही सांगू नका.
० संशयास्पद मेसेज पुढे फॉरवर्ड करू नका.
० ओळखीचा नंबर असला तरी पैशांची मागणी खात्रीशिवाय मान्य करू नका.
फसवणूक झाल्यास काय करावे
तत्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन १९३० वर कॉल करा. त्यानंतर www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्या व बँक/यूपीआय ॲप तत्काळ ब्लॉक करा. सरकारी यंत्रणा कधीही एपीके फाइल पाठवत नाहीत. त्यामुळे अशा फाइल्स म्हणजे फसवणूकच समजावी.