- सचिन राऊत,अकोला राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला शिक्षण संचालनालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार समायोजन करण्याबाबत २० नोव्हेंबर रोजी निर्गमित झालेल्या आदेशावरही ब्रेक लावण्यात आला आहे. यामुळे जिल्हा व विभागीय स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात मोठी चर्चा रंगली आहे.
२९ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षण संचालनालयाकडून जारी झालेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले की, २०२५-२६ च्या ऑनलाइन संचमान्यतेची पोर्टलवरील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ही मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित होणार आहे. त्यामुळे दोन वेळा स्वतंत्रपणे समायोजन प्रक्रिया राबविण्याला कोणताही अर्थ नसल्याचे संचालनालयाने परिपत्रकात नमूद केले आहे.
शिक्षकांवर टांगती तलवार कायम
यामुळे राज्यभरातील शिक्षक वर्गाच्या अपेक्षांना आता पुन्हा एकदा जून-जुलैसारखा 'प्रतीक्षा मोड' लागला असून, विभागीय कार्यालयांत या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. शिक्षकही या वारंवार होणाऱ्या प्रक्रियेमुळे गोंधळात सापडल्याची माहिती आहे.
नवीन संचमान्यता झाल्यावरच समायोजन
उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील निर्णयानंतर १५ मार्च २०२५ च्या शासन निर्णयान्वये समायोजनाची सुधारित कार्यपद्धती अवलंबण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी संचालनालयाने विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना उर्वरित रिक्त पदे व अतिरिक्त कर्मचारी यादी सादर करण्याचा आदेश दिला होता.
२०२५-२६ च्या संचमान्यता निर्गमनाआधी समायोजन प्रक्रिया केल्यास पुन्हा समायोजन करावे लागेल म्हणून, संचालनालयाने २० नोव्हेंबरचा आदेश स्थगिती करत फक्त नवीन संचमान्यता निर्गमित झाल्यानंतरच समायोजन करावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेवर स्थगिती देण्यात यावी यासाठी सर्वच शिक्षक संघटना एकवटलेल्या आहेत. शिक्षक समायोजन करू नये अशीच शिक्षकांची मागणी आहे. मात्र, त्यानंतरही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतर ही प्रक्रिया होण्याचे संकेत पत्रकात नमूद आहेत. मात्र, नवीन संच मान्यता रद्द करून शिक्षक समायोजन करूच नये, अशी मागणी आमची आहे. -डॉ. अविनाश बोर्डे, अमरावती, विभागीय अध्यक्ष, विज्युक्टा अकोला.