अहमदनगर : अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावरील हुंडेकरी व वाहतूक संघटनेच्या आडमुड्या धोरणामुळे बंद झालेले काम चालू होण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रेल्वे माथाडी कामगार युनियनच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढला. पाऊस सुरू असताना रेल्वे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून कामगार पायी आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर कामगारांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक प्रशांत गायकवाड, भैरवनाथ वाकळे, महेबूब सय्यद, गणेश केदार, मधुकर पाटोळे, संजय पाडळे, दीपक रोकडे, रोहिदास भालेराव, गणेश जाधव, सुरेश निर्भवणे, पंडित झेंडे, भगवान झेंडे, बळीराम झेंडे, संभाजी कोतकर, पोपट लोंढे, विलास उबाळे, सागर पोळ, शरद वाकचौरे, वसंत पेटारे आदींसह माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदनगर रेल्वेवरील लोडिंग-अनलोडिंगचे काम ४ ऑगस्ट २०२१ पासून हुंडेकरी व वाहतूक ठेकेदारांनी माल नगर रेल्वे स्टेशनवर आणणे बंद केले आहे. अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर माथाडी मंडळातील ६०० नोंदणीकृत कामगार काम करत आहेत. हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये दर ३ वर्षांसाठी करार होतो. गेल्या वर्षीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे केवळ एक वर्षाचाच करार झाला. ३१ मार्च २०२१ रोजी हा करार संपुष्टात आल्यानंतर कामगार, हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार संघटना यांच्यामध्ये बैठका झाल्या. मात्र, त्यात तोडगा न निघाल्याने कामगार संतापले.
सहायक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष आणि कामगार मंडळ अहमदनगर यांनी इतर जिल्ह्यांतील रेल्वे मालधक्क्यावरील प्रचलित दराचा विचार करून कामकाज सुरळीत होण्यासाठी २८ जुलै २०२१ रोजी मजुरी व वाराईचे दर निश्चित करून काम सुरू करण्याचे आदेश दिले. माथाडी कामगारांनी प्रस्तुत आदेश मान्य असल्याचे आणि काम करण्यास तयार असल्याचे लेखी स्वरूपात कळवले आहे; पण हुंडेकरी व वाहतूक ठेकेदारांनी अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर येणारा माल जाणीवपूर्वक इतरत्र स्थलांतरित केला. त्याचा फटका कामगारांना बसत आहे.
----------
फोटो- ०७ रेल्वे स्टेशन मोर्चा
नगर येथील रेल्वे स्टेशनवरील कामगारांनी, वाहतूकदार संघटनांनी माल रेल्वे स्टेशनवर उतरविणे बंद केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये सहाशे कामगारांनी सहभाग घेतल्याने आंदोलनात मोठी गर्दी दिसली. (छायाचित्र : साजीद शेख)