बंटी जहागीरदार कुठे पोहोचला? हत्या करणाऱ्यांना लोकेशनची माहिती देणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी कसे शोधले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:01 IST2026-01-06T18:59:29+5:302026-01-06T19:01:45+5:30
Bunty Jahagirdar: पुण्यातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याची हत्या करण्यात आली. जहागीरदार याची हत्या करण्यापूर्वी रेकी करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

बंटी जहागीरदार कुठे पोहोचला? हत्या करणाऱ्यांना लोकेशनची माहिती देणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी कसे शोधले?
Bunty Jahagirdar News: श्रीरामपूर येथील बंटी जहागीरदार याच्या हत्येप्रकरणात रेकी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मारेकऱ्यांबरोबर या दोघांचे वीसहून अधिक फोन कॉल झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संतोष रोकडे (वय २२) व मयूर वावधने (वय २५, दोघेही रा. सिद्धार्थनगर, श्रीरामपूर) अशी आहेत. यापूर्वी पोलिसांनी कृष्णा अरुण शिनगारे (वय २३) व रवींद्र गौतम निकाळजे (वय २०) या दोघांना अटक केली होती. शिनगारे व निकाळजे या दोघांनी बंटी याची दुचाकीवरून येत सहा गोळ्या झाडून हत्या केली होती.
गोळीबार करणाऱ्यांना देत होते प्रत्येक क्षणाची माहिती
संत लुक रुग्णालयाजवळ ३१ डिसेंबरला बंटी याची हत्या झाली होती. शिनगारे व निकाळजे या मारेकऱ्यांबरोबर रोकडे व वावधने यांचे वीसहून अधिक फोन कॉल्स पोलिसांना सापडले. बंटी याचे लोकेशन हे दोघेजण मारेकऱ्यांना वेळोवेळी देत होते.
या हत्येमध्ये पहारेकरी म्हणून त्यांनी भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. हत्येवेळचे लोकेशनही मारेकऱ्यांना त्यांनी दिले. दरम्यान, मारेकऱ्यांकडे पोलिसांना दोन मोबाईल फोन तसेच तीन सीम कार्ड सापडली आहेत. या मोबाईलचा सीडीआर तपासल्यानंतर पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा होत आहे.
मुख्य सूत्रधार अजूनही फरार
नगरसेवक रईस जहागीरदार, काँग्रेसचे पालिकेतील गटनेते मुजफ्फर शेख, माजी उपनगराध्यक्ष अंजूम शेख यांनी पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवार यांना निवेदन दिले आहे. त्यात मुख्य सूत्रधारांच्या अटकेची त्यांनी मागणी केली आहे.
हत्येमागील उद्देश अद्याप समोर आलेला नाही. तसेच हत्येला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर तसे मेसेज व्हायरल केले जात आहेत. शहरात गुंड प्रवृत्तीचे लोक अत्याचार व मालमत्ता जप्तीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होत आहेत. मुस्लिम समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी बंटी याची हत्या केल्याचे निवेदनात नमूद आहे.