बांगर्डेतील आदिवासी वस्तीत पायाभूत सुविधांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:46+5:302021-07-14T04:23:46+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील बांगर्डे शिवारातील रखरखत्या माळरानावर तीन ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजातील १० ते १२ कुटुंबांनी पाले ठोकली आहेत. ...

Waiting for infrastructure in the tribal areas of Bangarde | बांगर्डेतील आदिवासी वस्तीत पायाभूत सुविधांची प्रतीक्षा

बांगर्डेतील आदिवासी वस्तीत पायाभूत सुविधांची प्रतीक्षा

श्रीगोंदा : तालुक्यातील बांगर्डे शिवारातील रखरखत्या माळरानावर तीन ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजातील १० ते १२ कुटुंबांनी पाले ठोकली आहेत. ऊस तोडणी मजुरीते ते काम करतात. या कामातून त्यांनी अनेकांच्या जीवनात गोडवा निर्माण केला. पोलिसांना विविध गुन्ह्यांचा तपास करताना मदतही केली. मात्र ४० वर्षांनंतरही भिल्ल वस्तीत नागरी सुविधा आणि कौटुंबिक प्रगतीचा अरुणोदय झालेला नाही. येथील कुटुंबांना अद्यापही पायाभूत सुविधांची प्रतीक्षा आहे.

पूर्वी श्रीगोंद्याची दुष्काळ तालुका अशी ओळख होती. काळाच्या ओघात सिंचन क्रांती झाल्याने तालुक्याचे चित्र बदलले. मात्र दुष्काळी भागातील बांगर्डे येथील भिल्ल वस्तीतील नागरिकांना ना जातीचे दाखले, ना आधार कार्ड, ना रेशन कार्ड, ना बँकेचे पासबूक, ना विजेचा दिवा अशी अवस्था आहे. त्यामुळे कोणत्याच शासकीय योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळत नाही. गावागावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी आरओ सिस्टिम सुरू झाल्या आहेत. मात्र भिल्ल वस्तीत साधा हातपंपही नाही.

पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यावर ते ऊस तोडणी करत आहेत. जंगल नष्ट झाल्याने शिकारीही बंद झाल्या. अशा परिस्थितीत येथील एकलव्य हे चोरीच्या ठिकाणी माग काढून चोर पकडून देण्यास मदत करतात. बांगर्डेच्या सरपंच अश्विनी खोटे व माजी सरपंच बाबासाहेब गायकवाड यांच्या मदतीने या भिल्ल वस्तीतील व्यथा समोर आल्या.

-----आधार कार्ड, रेशनकार्ड नसल्याने आम्ही भारतीय नागरिक आहोत की नाही हेच समजत नाही. आम्हाला कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही, असे आम्ही काय पाप केले.

-भानुदास बर्डे,

ग्रामस्थ, बांगर्डे, ता. श्रीगोंदा

----

भिल्ल वस्तीतील नागरिकांकडे जातीचे दाखले नाहीत. त्यामुळे त्यांना ना घरकूल ना रस्ता देता येत. अगोदर महसूल विभागाने त्यांना दाखले द्यावेत. त्यानंतर त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होईल.

-अश्विनी खोटे,

सरपंच, बांगर्डे

----

१२ बांगर्डे

बांगर्डे येथील पालात राहणारे भिल्ल समाजातील कुटुंबीय.

Web Title: Waiting for infrastructure in the tribal areas of Bangarde