अहमदनगर : राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभागरचना लागू केल्याने अहमदनगर शहरातील वाॅर्डरचना पुन्हा बदलणार आहे. सध्या चार सदस्यीय प्रभाग आहे. नव्या रचनेत १७ ऐवजी २३ प्रभाग होतील. यामुळे इच्छुक उमेदवारांची झोप उडाली असून, त्यांच्या निवडणूक तयारीवरही पाणी फिरले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. अहमदनगर महापालिकेची पहिली निवडणूक त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार घेण्यात आली होती. त्यानंतर २००८ मध्ये एक सदस्यीय, सन २०१३ मध्ये दाेन सदस्यीय आणि सध्या चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणुका झाल्या आहेत. महापालिकेची पहिली निवडणूक त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार झाली हाेती. आता पुन्हा तीच प्रभाग पद्धती लागू होणार आहे. सध्याच्या नगरसेवकांनी एकमेकांशी साटेलोटे करीत निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र त्रिसदस्यीय प्रभागरचना लागू झाल्याने त्यांना आता नवी राजकीय समीकरणे जुळवावी लागतील.
...
महापालिकेची सध्याची परिस्थिती
महापालिकेची निवडणूक सन २०१८ मध्ये झालेली आहे. सध्या १७ प्रभाग असून, या प्रभागातून प्रत्येकी चार, याप्रमाणे ६८ नगरसेवक निवडून आलेले आहेत. साधारण १५ ते २० हजार मतदारांचा एक प्रभाग आहे.
...
अशी असेल महापालिकेची स्थिती
शासनाच्या नव्या नियमामुळे सध्याच्या १७ वाॅर्डऐवजी २३ वाॅर्ड हाेतील. नगरसेवकांच्या संख्येत १ ते ५ पर्यंत बदल होऊ शकतात. साधारण वाॅर्ड १५ ते १८ हजार मतदारांचे असतील. त्यात आरक्षित व खुल्या जागेनुसार प्रभागांची रचना करावी लागणार आहे.
.....
एका मतदारास करावे लागणार तिघांना मतदान
तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एका मतदाराला चार उमेदवारांना मते द्यावी लागली होती. त्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका होत्या. आता चारऐवजी तिघांना मतदान करावे लागणार आहे. यापूर्वी शहरातील मतदारांनी तीन, एक, दोन आणि चार जणांना मतदान केलेले आहे.
................
शहराच्या विकासाला बसणार खीळ
सध्याच्या चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रभागाची लांबी, रुंदी मोठी आहे. काही प्रभागात एकाच परिसरात तीन-चार नगरसेवक आहेत. ते केवळ त्या परिसरातच कामे करतात. त्यामुळे शहराच्या समतोल विकासाला खीळ बसली असून, पुढील निवडणुकीत असेच चित्र पहायला मिळेल.
....
तीन प्रभाग सदस्य रचनेला काँग्रेसने पक्षस्तरावर राज्यपातळीवर विरोध केला आहे. काल तसा ठराव मुंबईतील बैठकीत करण्यात आला आहे. दोन सदस्यांचा प्रभाग असावा, अशी पक्षाची मागणी आहे. दोन सदस्यांचा प्रभाग झाल्यास स्वागतच आहे.
-किरण काळे, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
......
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. त्रिसदस्यीय प्रभागरचना झाली तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून महापालिका ताब्यात घेईल.
-दिलीप सातपुते, शहरप्रमुख, शिवसेना
.....
राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. जरी शासनाने एक किंवा दोन सदस्यीय प्रभागरचना केली असती तरी त्याचे आम्ही स्वागतच केले असते. प्रभागाचा विकास हेच पक्षाचे धोरण आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप यांचाही या प्रभागरचनेला पाठिंबा आहे.
- माणिक विधाते, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस