खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज फडकणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जाणार आहे. हा ध्वज ७४ मीटरचा असेल.
देशातील मुख्य धार्मिक ठिकाणांसह पंढरपूरला हा ध्वज नेला जाणार आहे. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल. याबाबत रोहित पवार म्हणाले, हा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे. या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
खर्ड्याच्या किल्ल्यात फडकविण्यात येणाऱ्या ७४ मीटर भगव्या स्वराज्य ध्वजाचे संत-महंतांच्या हस्ते रविवारी पूजन करण्यात आले. यानंतर पुढील दोन महिने देशभरातील प्रमुख ७४ आध्यात्मिक व धार्मिक स्थळी, संतपीठांच्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांवर हा ध्वज नेण्यात येणार आहे. तिथे पूजन केल्यानंतर शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात या ध्वजाची पूजा करून १५ ऑक्टोबर रोजी तो मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत खर्ड्याच्या किल्ल्यात फडकविण्यात येणार आहे.
हा ध्वज जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरेलच. मात्र सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती याचे प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील, असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला.