घ्या..बंधू..पाणी घ्या..!

By Admin | Updated: September 24, 2016 00:10 IST2016-09-24T00:05:52+5:302016-09-24T00:10:32+5:30

अहमदनगर : डोक्यात जाळीदार पांढऱ्या शुभ्र टोप्या. पांढरा कुर्ता, पायजमा. दाढी. अन् दंडाला कोपर्डी घटनेच्या निषेधदर्शक काळ्या पट्ट्या बांधलेल्या.

Take..but..who take water ..! | घ्या..बंधू..पाणी घ्या..!

घ्या..बंधू..पाणी घ्या..!

अहमदनगर : डोक्यात जाळीदार पांढऱ्या शुभ्र टोप्या. पांढरा कुर्ता, पायजमा. दाढी. अन् दंडाला कोपर्डी घटनेच्या निषेधदर्शक काळ्या पट्ट्या बांधलेल्या. अशा पेहरावातील तरुण नगरच्या कोठला बसस्थानकाजवळील राज चेंबर्ससमोर उभे होते. असंच चित्र पोस्टासमोर. नगरमधील मराठा क्रांती महामोर्चासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येकाला ‘घ्या...बंधू...पाणी घ्या’, म्हणत हे तरुण पाण्याचे पाऊच पुढे करीत होते.
मोर्चा मराठा समाजाचा असला तरी त्यांची तहान भागविण्याचं काम शुक्रवारी नगरमधील मुस्लीम समाजाचे तरुण करताना दिसत होते. या तरुणांच्या सोबतीला लहान मुले व काही ज्येष्ठही होते. कोठला येथे अजिजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी थंडपाण्याचे जार या ठिकाणी रांगेत ठेवले होते. शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्यातील मोर्चेकरी स्टेट बँक चौकातून पोस्टासमोरुन जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे वाडिया पार्ककडे जात होते. त्यांच्यासाठी पोस्टासमोर मुस्लीम युवकांच्या युवा क्रांती ग्रुपतर्फे पिण्याच्या पाण्याचे पाऊच वाटप केले जात होते. समीर बागवान, मोहसीन शेख, आयूब खान, सरफराज बागवान, अन्सार शेख, नजीर शेख आदी तरुण पाणी देत होते. बुथ रुग्णालयाच्या थोडे पुढे अहमदनगर सोशल क्लबचा मंडप होता. तेथे नईम सरदार, शेख मोमीन,जावेद अल्ताफ,अन्वर सय्यद, सय्यद नाजीर, आर्किटेक्ट फिरोज, इम्रान बागवान, शकूर शेख, मोहसीन पहेलवान,जावेद शेख, आदिल सय्यद, अल्तमाश जरीवाला, अब्दूल सत्तार बागवान, डॉ. साहील अहमद पाणी देत होते. सकाळी याठिकाणी नाश्ताही देण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Take..but..who take water ..!