शस्त्रक्रिया, थांबलेले उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:37+5:302021-07-14T04:23:37+5:30
--------- सुदाम देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून थाबंलेल्या शस्त्रक्रिया व इतर आजारांवरील उपचार आता ...

शस्त्रक्रिया, थांबलेले उपचार सुरू
---------
सुदाम देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून थाबंलेल्या शस्त्रक्रिया व इतर आजारांवरील उपचार आता जिल्हा रुग्णालयात सुरू झाले आहेत. सध्या कोरोनाचे रुग्ण असल्याने टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रियाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय पूर्वपदावर येत आहे. इतर उपचार घेणाऱ्यांची संख्याही आता जिल्हा रुग्णालयात वाढत आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून इतर आजारांच्या शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष झाले होते. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये इतर सर्व शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. एकाच दिवशी चारशेपर्यंत कोरोनाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल व्हायचे. त्यामुळे इतर आजारांवरील रुग्णांना विळद घाट येथील विखे फौंडेशनमध्ये पाठविण्यात येत होते. प्रसुतीसाठी महिलांना महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात पाठविण्यात आले. जिल्ह्यात कोराेनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे इतर आजारांसाठीही आरोग्य सेवा पूर्वपदावर आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आता वाढ होत आहे. गेल्या एक महिन्यात हजारो रुग्णांनी उपचार घेतला आहे. इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास वेग आला आहे. कोरोनाच्या काळात येथील ओपीडी जवळपास बंदच होती. कोरोना काळात रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष झाले होते.
----------
ओपीडीत होऊ लागली गर्दी
जिल्ह्यात एकमेव असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये, तसेच ग्रामीण रुग्णालयांचा आढावा घेतला असता रुग्ण तपासणी नियमित हाेत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दोनशेपेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. रुग्ण उपचारासाठी रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.
-----------
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरही उपचार करण्यात येत आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे ११२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे या रुग्णांचा संसर्ग इतर रुग्णांना होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. एकाचवेळी सर्व उपचार सुरू करणे तसे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व उपचार सुरू करण्यात येत आहेत.
-डॉ. वसंत जमधडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक
-----------
जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणारे रुग्ण- ११२
जिल्हा रुग्णालयात रिकामे असलेले बेड्स - २०० ते २५०
-----------
गरिबांवर इथे झाले उपचार
कोरोनाच्या काळात जिल्हा रुग्णालयातील इतर आजारांवरील उपचार बंद करण्यात आले होते. मात्र, इथे येणाऱ्या सर्व रुग्णांना विळद येथील विखे फौंडेशनमध्ये उपचार करण्यात आले होते. प्रसुतीसाठी कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात महिलांवर मोफत उपचार करण्यात आले. दोन्ही ठिकाणी रुग्णांना उपचारासाठी पाठविण्यात आले असले तरी जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गतच हे उपचार झाले.
----------
कोरोनावरही उपचार सुरू
जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे सध्या ११२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये आयसीयू ३४, पॉझिटिव्ह ४५, आरोपी ५, कोरोनाचे संशयित २८ अशा एकूण ११२ रुग्णांचा समावेश आहे. इतर आजारांचे ५० ते ६० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचे काम रोज सुरू असल्याचे डॉ. जमधडे यांनी सांगितले.
----------