साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 04:53 IST2025-05-14T04:52:00+5:302025-05-14T04:53:33+5:30
देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पास, प्रसाद, पूजेचे कुपन्स, सन्मानचिन्हे यांचा लाभ मिळणार आहे.

साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी: साईबाबा श्री संस्थानच्या तदर्थ समितीने सुधारित देणगी धोरणास मान्यता दिली आहे. यानुसार देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पास, प्रसाद, पूजेचे कुपन्स, सन्मानचिन्हे यांचा लाभ मिळणार आहे. मोठ्या देणग्यांकरिता तहहयात व्हीव्हीआयपी दर्शनाबरोबरच वस्त्र अर्पणाच्या संधी देखील मिळणार आहेत, असे संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.
श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
१०,००० ते २४,९९९ रुपये: ५ सदस्यांसाठी एक वेळचा आरती पास, ५ उदी प्रसाद पॅकेट्स व १ लाडू प्रसाद.
२५,००० ते ५०,००० रुपये: दोन वेळा आरती/दर्शन पास, ३ डी पॉकेट फोटो, ५ उदी, १ साई चरित्र, २ लाडू प्रसाद.
५०,००१ ते ९९,९९९ रुपये: २ व्हीव्हीआयपी आरती पास, सन्मानचिन्हे, ५ उदी, साई सतचरित्र, २ लाडू प्रसाद.
१ लाख ते ९.९९ लाख रुपये: पहिल्या वर्षी २ व पुढील वर्षांसाठी प्रत्येकी १ व्हीव्हीआयपी पास, एक वेळचे वर्षातून मोफत दर्शन, सन्मान शॉल, ३ फोटो, पूजेचे कूपन, भोजन पास, वस्त्र व प्रसाद भेट.
१० लाख ते ५० लाख रुपये: प्रत्येक वर्षी २ व्हीव्हीआयपी आरती पास, वर्षातून एक वेळ मोफत प्रोटोकॉल दर्शन, साईबाबांना वस्त्र अर्पणाची संधी, वस्त्र भेट, साई मूर्ती, पूजेचे कूपन्स, भोजन पास.
५० लाखांहून अधिक : आयुष्यभर दरवर्षी ३ व्हीव्हीआयपी आरती, दोन प्रोटोकॉल दर्शन पास, वस्त्र अर्पण, साई मूर्ती, सन्मान चिन्हे, भोजन पास.
अंबाबाई, जोतिबा दर्शनासाठी ड्रेसकोड
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तोकडे कपडे घालून येण्यास मनाई केली आहे. महिला मुलींना अंगप्रदर्शन होईल असे शॉर्ट स्कर्ट, पाश्चिमात्य कपडे, तसेच पुरुषांनादेखील बर्म्युडा, थ्री फोर्थ असे कपडे घालून या दोन्ही मंदिरांमध्ये दर्शनासाठी येता येणार नाही.