साडेसहा हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST2021-03-26T04:21:17+5:302021-03-26T04:21:17+5:30
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत ६ हजार ७१६ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना ...

साडेसहा हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत ६ हजार ७१६ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना १ एप्रिलपासून लसीकरणाची सुरुवात होणार आहे. ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ३३ आरोग्य उपकेंद्रे लसीकरणासाठी सज्ज करण्यात येत आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाचाही वेग वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्तांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले होते. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होती. १ एप्रिलपासून ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील ३३ आरोग्य उपकेंद्रांमध्ये आठवड्यातील तीन दिवस लसीकरण केले जाणार. नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. एका लसीकरण केंद्रावर पाच कर्मचारी आवश्यक आहेत. तालुक्यामध्ये आरोग्य विभागामध्ये सुमारे ४५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची मोठी अडचण आरोग्य विभागासमोर आहे.
त्यातच कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे त्यासंबंधी उपाययोजना करण्याचीही जबाबदारी आरोग्य विभागावर आहे.
कोरोनाच्या गंभीर परिणामांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याची जनजागृती आरोग्य कर्मचारी आणि आशासेविका करीत आहेत.
---
१ एप्रिलपासून ४५ वर्षे वयाच्या पुढील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी. कोरोना प्रतिबंधक लस पूर्णत: सुरक्षित आहे. लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.
- डाॅ. नितीन खामकर,
तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, श्रीगोंदा