संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, तारकपूर आणि जामखेड या पाच आगारांमध्ये एकूण २२ शिवशाही बसेस आहेत. या वातानुकूलित बसमधून प्रवास करण्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून विविध मार्गांवर शिवशाही बसेस धावत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ११ आगार आहेत. परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील चारशे बसेसला ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आले. यात वातानुकूलित शिवशाही बसेसचादेखील समावेश आहे. विशिष्ट पद्धतीने करण्यात आलेल्या केमिकल कोटिंगमुळे प्रवाशांचे कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होते आहे.
कोरोनामुळे परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले. प्रवासी संख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील अनेक आगारांतील बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. प्रवासी संख्या वाढत असल्याने बसेसच्या फेऱ्यादेखील वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर महामंडळाची बससेवा सुरू करण्यात आली. शिवशाही बसेसच्या फेऱ्यादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात प्रवासी संख्या वाढल्यानंतर शिवशाही व इतर बसेसच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या संगमनेर-पुणे, कोपरगाव-पुणे, श्रीरामपूर-पुणे, तारकपूर-कल्याण, तारकपूर-पुणे या मार्गांवर शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. कोपरगाव-पुणे ही शिवशाही बस संगमनेर मार्गे पुण्याला जाते.
---------------
सध्या सुरू असलेल्या शिवशाही
संगमनेर-पुणे
कोपरगाव-पुणे
श्रीरामपूर-पुणे
तारकपूर-कल्याण
तारकपूर-पुणे
-------------
ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग
संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, तारकपूर आणि जामखेड या पाच आगारांमध्ये एकूण २२ शिवशाही बसेस आहेत. या सर्वच बसेसना ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आले आहे.
----------
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच बसेसला दर दोन महिन्यांनी ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग केले जाणार आहे. शिवशाही बसने प्रवास करण्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन प्रवाशांनी करणे बंधनकारक आहे. प्रवासी संख्या वाढल्यानंतर बसेसच्या फेऱ्यादेखील वाढविण्यात येतील.
विजय गीते, विभाग नियंत्रक, अहमदनगर विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
................
star 1137