Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 20:26 IST2026-01-07T20:25:15+5:302026-01-07T20:26:31+5:30
महिनाभरापूर्वी शिर्डीत राहणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्या तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना महिनाभरानंतर यश आले.

Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
१० डिसेंबर २०२५ रोजी शिर्डीमध्ये राहणाऱ्या सचिन गिधे हा तरुण बेपत्ता झाला. पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली. सचिनच्या पत्नीने सांगितले की, एका व्यक्तीने तुझ्या नवऱ्याचे हातपाय तोडावे लागतील, अशी धमकी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पण, सचिनचा मृतदेह मिळाला.
पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आरोपींपर्यंत पोहोचले. सापळा रचून पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली. दीपक पोकळे आणि प्रवीण वाघमारे अशी प्रमुख आरोपींची नावे असून त्यांच्या साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
सचिन गिधे हत्या, काय घडले?
शिर्डीतील हॉलिडे पार्क परिसरात सचिन कल्याणराव गिधे राहायचा. तो १० डिसेंबर २०२५ रोजी साई सुनिता हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. त्यावेळी प्रवीण वाघमारे सचिनच्या बायकोला कॉल केला आणि म्हणाला की, 'तुझा नवरा माजला आहे. त्याचे हातपाय तोडावे लागतील.'
या धमकीनंतर सचिन गिधे बेपत्ताच झाला. १५ डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीने पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सचिन गिधे यांचा शोध सुरू केला.
दुसरी घटना आली समोर, दगडाने ठेचले पाय
तपास करत असताना पोलिसांना आणखी एक घटना कळली. ज्या दिवशी सचिन गिधेचं अपहरण झालं, त्याच दिवशी याच आरोपींनी गौतम निकाळे नावाच्या तरुणाला साकुरी शिवारात मारहाण केली. त्याचे पाय दगडाने ठेचले आणि मोडले. त्यातून प्रवीण हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन केले. आरोपी आणि त्याचे साथीदार संगमनेरमधील मेंढवण शिवारात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ६ जानेवारी रोजी परिसराला वेढा दिला आणि दीपक पोकळे, दरेकर यांना बेड्या ठोकल्या.
सचिन गिधेची हत्या का केली?
अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची चौकशी केली. त्यात त्यांनी सचिन गिधेची हत्या केल्याची कबूली दिली. तसेच अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून त्याला मारल्याचे सांगितले.
दीपक पोकळे, गणेश दरेकर, प्रवीण वाघमारे आणि कृष्णा वाघमारे यांनी सचिन गिधेची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहावर टायर टाकले आणि डिझेल ओतून मृतदेह जाळला.