शहरातील शिधापत्रिकांची प्रकरणे दोन महिन्यांपासून प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:06+5:302021-09-25T04:21:06+5:30
येथील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात दररोज शिधापत्रिकेशी संबंधित कामांसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यातील बहुतेक नागरिकांची शिधापत्रिकेतील नावे वाढविणे, ...

शहरातील शिधापत्रिकांची प्रकरणे दोन महिन्यांपासून प्रलंबित
येथील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात दररोज शिधापत्रिकेशी संबंधित कामांसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यातील बहुतेक नागरिकांची शिधापत्रिकेतील नावे वाढविणे, नावे कमी करणे, आधार क्रमांक लिंक करणे, शिधापत्रिका दुसऱ्या जिल्ह्यात हस्तांतरित करणे, जीर्ण शिधापत्रिका बदलून घेणे, नावात दुरुस्ती आदी स्वरूपाची कामे वर्षभरापासून रखडली आहेत.
वर्षभरापूर्वी ५ ॲाक्टोबर २०२० मध्ये येथील अन्नधान्य वितरण अधिकारी पवार यांची बदली झाली. तेव्हापासून येथे नियमित कोणीही अधिकारी बदलून आलेला नाही. आतापर्यंत या पदाचा अतिरिक्त पदभार दोन अधिकाऱ्यांकडे आला. २२ जून २०२१ पासून सहायक पुरवठा अधिकारी किशोर कदम यांच्याकडे अन्नधान्यचा अतिरिक्त चार्ज आहे. त्यांना त्यांची नियमित कामे सांभाळून हेही काम पहावे लागते. त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित पडली आहेत. सध्या गेल्या तीन महिन्यांपासून १२७ नवीन शिधापत्रिकांची प्रकरणे प्रलंबित आहेत.
-------------
कार्यालयात शुकशुकाट
कार्यालयात नागरिकांना समाधानकारक माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना या कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. अर्जांना कोणीही वाली नसल्याने त्यांचे अर्ज धूळखात पडून आहेत. दुपारी दीडनंतर कार्यालयात शुकशुकाट असतो. अधिकारी नाही, कर्मचारी नाही, नंतर या, उद्या या, महिन्याने या, असे सांगितले जाते.
-------------
एजंटांचा सुळसुळाट
एकीकडे नागरिक शिधापत्रिकांसाठी चकरा मारत असताना दुसरीकडे एजंटांमार्फत मात्र लगेच कामे केली जातात. त्यामुळे नागरिकांचा आर्थिक कोंडमारा होत आहे. या कार्यालयातील अनागोंदीमुळे अगोदरच त्रासलेल्या नागरिकांना महिनोन्महिने चकरा मारण्याची वेळ आल्याने नागरिकांची अवस्था आगीतून फुफाट्यात सापडल्यासारखी झाली आहे.
-----------------------------
नवीन अधिकारी आल्या नि रजेवर गेल्या
मागील आठवड्यात नगर येथील अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून शेवगावच्या तहसीलदार अर्जना पागिरे-भाकड यांची बदली झाली. मात्र त्या अद्याप हजर झालेल्या नाहीत. त्या रजेवर असल्याची माहिती कार्यालयातून समजली.
--------------
गेल्या वर्षभरापासून येथे नियमित अधिकारी नाही. अतिरिक्त कार्यभार असल्याने काहीशी कसरत होते. कार्यालयात कर्मचारीही कमी आहेत. प्रकरणे ॲानलाइन करण्यातही अडचणी येतात. मात्र प्रकरणांचा निपटारा करण्याचे काम सुरू आहे. सध्या नवीन शिधापत्रिकांची १२७ प्रकरणे प्रलंबित आहेत.
- किशोर कदम, प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी
---------------
वर्षभरापासून अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याचे पद रिक्त होते. या काळात इतर अधिकाऱ्यांकडे पदभार होता. मात्र मागील आठवड्यात येथे नियमित अधिकारी बदलून आलेले आहेत.
- डाॅ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी