Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:37 IST2025-07-28T13:37:14+5:302025-07-28T13:37:14+5:30
Nitin Shete Death: शनि शिंगणापूर संस्थानच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झालेली असतानाच संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आयुष्य संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
Shani Shingnapur Trust News: अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर संस्थानमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. शनि शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली. सोमवारी (२८ जुलै) पहाटे घरातच गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवले. भ्रष्टाचार प्रकरणाची सरकार चौकशी सुरू झालेली असतानाच शेटे यांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शेटे यांनी त्यांच्या राहत्या घरात सकाळी आठ वाजता छताला दोरी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती समोर आल्यानंतर शनि शिंगणापूर गावात गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घरी गेले.
पोलिसांनी दोरीला लटकलेल्या अवस्थेत असलेला नितीन शेटे यांचा मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांना अधिकच्या तपासासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
पावसाळी अधिवेशनात गाजले भ्रष्टाचार प्रकरण
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शनि शिंगणापूर संस्थानमध्ये नोकर भरती आणि इतर कामात भ्रष्टचार झाल्याचे प्रकरण गाजले. ११४ मुस्लीम कर्मचाऱ्यांना संस्थानने नोकरीवर घेतले. त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.
त्याचबरोबर शनि शिंगणापूर संस्थानचे बोगस अॅप तयार करून पैशांची गैरव्यवहार करण्यात आल्याचाही आरोप झाला. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरण विधानसभेत गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर कर्मचारी आणि विश्वस्त यांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करू असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते.
राज्य सरकारने विश्वस्त मंडळ बरखास्त करून चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसातच संस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.