मांडवे, निंबोडीसह पाच सोसायट्यांची सात मार्चला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:29+5:302021-02-05T06:35:29+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील मांडवे तसेच निंबोडीसह जिल्ह्यातील ५ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांची निवडणूक शुक्रवारी (दि. २९) जाहीर ...

March 7 election of five societies including Mandwe, Nimbodi | मांडवे, निंबोडीसह पाच सोसायट्यांची सात मार्चला निवडणूक

मांडवे, निंबोडीसह पाच सोसायट्यांची सात मार्चला निवडणूक

केडगाव : नगर तालुक्यातील मांडवे तसेच निंबोडीसह जिल्ह्यातील ५ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांची निवडणूक शुक्रवारी (दि. २९) जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी ७ मार्च रोजी मतदान होणार आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नगर तालुक्यातील मांडवे व निंबोडी तसेच श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव, शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर व पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी सोसायटीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत असणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ पासून सुरू होणार आहे. वैध उमेदवारी अर्जांची यादी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज माघारीसाठी ८ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चिन्ह वाटप करण्यात येऊन त्याच दिवशी अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान प्रक्रिया ७ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून, मतदान संपल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.

---

निबंधक कार्यालयातच निवडणूक प्रक्रिया

निवडणूक कार्यालय आता तालुक्याच्या ठिकाणी

सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय यापूर्वी सोसायटीच्या कार्यालयातच असायचे; मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून, निवडणूक कार्यालय हे संबंधित तालुक्याच्या उपनिबंधक कार्यालयात राहणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरणे, छाननी व माघारीची प्रक्रिया तसेच चिन्ह वाटप हे तालुका उपनिबंधक कार्यालयात होणार आहे.

---

बाबुर्डी घुमटच्या निवडणुकीला स्थगिती..

नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट सोसायटीची निवडणूक गतवर्षीच होणार होती. मात्र, कर्जमाफी प्रक्रिया तसेच कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलली गेली. त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यावेळी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेक सभासद थकबाकीदार होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ४ जानेवारी २०२१ रोजीपासून ज्या ठिकाणी प्रक्रिया थांबली होती तेथून पुढे चालू करण्याचे आदेश दिल्याने त्यावेळी थकबाकीदार असलेले मात्र कर्जमाफीनंतर थकबाकीदार न राहिलेल्या सभासदांना मतदानाचा अधिकारी मिळावा, या मागणीसाठी काही सभासद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेलेले आहेत. खंडपीठाने पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे बाबुर्डी घुमट सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. या संदर्भातील याचिकेवर ८ फेब्रुवारीला सुनावणी होणार असून, त्यानंतर निवडणुकीबाबत निर्णय होणार आहे.

Web Title: March 7 election of five societies including Mandwe, Nimbodi