पाणी योजनेच्या देखभालीचा भार ३५ कर्मचाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:40+5:302021-03-26T04:20:40+5:30
अहमदनगर : शहराला पाणीपुवठा करणाऱ्या पाणी योजनेवरील अकरा वर्षांत ७६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून, ही पदे मनपाकडून भरली गेले ...

पाणी योजनेच्या देखभालीचा भार ३५ कर्मचाऱ्यांवर
अहमदनगर : शहराला पाणीपुवठा करणाऱ्या पाणी योजनेवरील अकरा वर्षांत ७६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून, ही पदे मनपाकडून भरली गेले नाहीत. त्यामुळे पाणी योजनेच्या देखभालीचा भार ३५ कर्मचाऱ्यांवर आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांअभावी पाणी योजनेचा खेळखंडोबा झाला आहे.
शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होतो. मुळा धरणात मनपाचे पंपिंग स्टेशन आहे. तेथून पाणी विळद येथे येते. विळद येथील जलशुद्धीकरण केंद्रातून एक जलवाहिनी वसंत टेकडी येथे, तर दुसरी जलवाहिनी नागापूर येथे येते. पाणी योजनेचे तीन टप्पे आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी योजना सन १९९९ मध्ये नगर परिषदेकडे हस्तांतरित झाली. त्यावेळी पाणी योजनेच्या देखभालीसाठी १११ कर्मचारी कार्यरत होते. गेल्या अकरा वर्षांत ७६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. ही अत्यावश्यक सेवा असूनही नव्याने कर्मचाऱ्यांची भरती केली गेली नाही. या उलट आरोग्यासह इतर विभागात मात्र वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने भरती केली गेली; परंतु पाणी योजनेसाठी मात्र कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. त्यामुळे मुळानगर येथे अवघे ६ कर्मचारी काम करत आहेत. त्यातही तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. विळदघाट जलशुद्धीकरण केंद्रात १६ कर्मचारी कार्यरत होते. सध्या तिथे ४ कर्मचारी काम करत आहेत. वसंत टेकडी येथेही कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.
.....
मनपातील ११८६ पदे रिक्त
महापालिकेत १ हजार ७१८ कर्मचारी कार्यरत असून, १ हजार १८६ पदे रिक्त आहेत. हे कर्मचारी पुढीलप्रमाणे आहेत.
वर्ग-१ कार्यरत -०९, रिक्त पदे-२८
वर्ग-२ कार्यरत -२१ रिक्त पदे- ३७
वर्ग-३ कार्यरत -३३२ रिक्त पदे-५५०
वर्ग-४ कार्यरत-१३५६ रिक्त पदे-५७१