कुष्ठधाम रोड होणार मॉडेल रोड

By Admin | Updated: September 20, 2016 00:13 IST2016-09-20T00:08:36+5:302016-09-20T00:13:25+5:30

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीने महापालिकेला सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून सावेडी येथील कुष्ठधाम रस्ता मॉडेल रोड म्हणून विकसित करण्यात येणार आहे,

Leptham road going model road | कुष्ठधाम रोड होणार मॉडेल रोड

कुष्ठधाम रोड होणार मॉडेल रोड

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीने महापालिकेला सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून सावेडी येथील कुष्ठधाम रस्ता मॉडेल रोड म्हणून विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी दिली.
महापौरांच्या दालनात सोमवारी झालेल्या बैठकीत वरील निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून महापालिकेला सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या निधीमधून कोणती विकास कामे करायची,यासाठी सोमवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीमध्ये सदरचा रस्ता मॉडेल करण्याचा निर्णय झाला. युतीच्या नगरसेवकांनी चार ते पाच रस्त्यांची सूचना मांडली होती. त्यामध्ये कुष्ठधाम रोड, काटवन खंडोबा रोड, गुलमोहोर रोड या रस्त्यांचा समावेश होता. त्यामध्ये कुष्ठधाम रस्ता मॉडेल रस्ता करण्याचा निर्णय झाला. तोफखाना पोलीस ठाणे ते गुलमोहोर रोड कॉर्नरपर्यंतचा हा रस्ता आधीच मूलभूत विकास निधीमधून मंजूर झालेला आहे. याच रस्त्याच्या मजबुतीकरणाची लांबी वाढविण्यात येणार आहे. मिस्किन मळा ते तोफखाना पोलीस ठाणे ते गुलमोहोर रोड कॉर्नर ते भिस्तबाग चौक इथपर्यंतचा हा रस्ता मॉडेल करण्यात येणार आहे. फुटपाथ, रस्त्याच्या मध्यभागी पथदिवे, झाडी, गटारी, रस्ता रुंदीकरण आदी कामांचा या प्रकल्पात समावेश करण्यात येणार आहे. या रस्त्यामध्ये दोन नाल्यांचा समावेश असून त्यावर पूल बांधण्याबाबत आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे. या रस्त्याचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे छिंदम यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Leptham road going model road