लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : येथील जैन स्थानक विश्वस्त संस्थेवर तातडीने प्रशासक नियुक्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित मुथ्था यांनी विधी व न्याय विभागाकडे केली आहे. त्यावर नगर येथील धर्मादाय आयुक्तांना दोन दिवसांत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या २३ वर्षांपासून विश्वस्त संस्थेची निवडणूक विविध कारणांनी होऊ शकलेली नाही. मात्र, त्यामुळे एकाच विश्वस्त मंडळाकडे या काळात सत्ता राहिल्याचा आरोप मुथ्था यांनी केला होता. त्यासंदर्भात त्यांनी विधी व न्याय विभागाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत उचित कार्यवाहीचे आदेश नगर येथील धर्मादाय आयुक्तांना १६ मार्च रोजी देण्यात आले आहेत.
विश्वस्त संस्थेचा नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, एकही सभासद उमेदवारीसाठी पात्र ठरू न शकल्याने निवडणूक पार पडू शकली नाही. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. संस्थेची आतापर्यंत कोणतीही वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नाही. मालमत्ता खरेदी, विक्री करताना धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली गेली नाही. मात्र, तरीही येथे प्रशासक नियुक्त करण्यात आला नाही, असे मुथ्था यांचे म्हणणे आहे.