Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 10:34 IST

Mumbai Nesco Music Concert: म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांची चौकशी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: कॉन्सर्टमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत एक्स्टॅसी हे पार्टी ड्रग्ज विकणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांच्या टोळीला विनातिकीट प्रवेश नसलेल्या गेटमधून कॉन्सर्टमध्ये सोडणाऱ्या सुरक्षा रक्षकाला वनराई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्रदीप गुप्ता, असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, त्याने हजार ते दोन हजार रुपये घेत या टोळीला आत सोडले होते. त्याने कुणाच्या सांगण्यावरून त्यांना आत सोडले? याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, आता अटक आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे.

नेस्को आणि नागपूरच्या इन्स्पायरिंग टाय कंपनीने नाईन टाईम्स नाईन टेक्नो म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करत, सुरक्षेची जबाबदारी सेफक्युअर या सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सीवर सोपवली. एजन्सीचा सुरक्षा रक्षक असलेल्या गुप्ताने विनीत गेरेवाल, आयुष साहित्य आणि त्यांच्या अन्य साथीदारांना प्रत्येकी हजार ते दोन हजार रुपये स्वीकारून विनातिकीट मुख्य प्रवेशद्वार टाळून प्रवेश नसलेल्या गेट क्रमांक नऊ येथून प्रवेश दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

प्रदीप गुप्ता हा या मुलांना आधीपासून ओळखत होता का? त्याचे कर्तव्य मुख्य प्रवेशद्वारावर नव्हते. तरी देखील त्याने या तरुणांना प्रवेश नसलेल्या गेटमधून आत कसे आणि कुणाच्या सांगण्यावरून सोडले? आयोजकांकडून आत प्रवेश देण्यात आला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्याआधारे अटकेत असलेल्या आयोजकांपैकी आकाश सामल (इन्स्पायरिंग टाय), सनी जैन आणि बालकृष्णन कुरूप (नेस्को) यांच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे देण्यात येत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे समोर आले.

गुप्ताचे नाव समोर येताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तो सायन कोळीवाडा येथील रहिवासी असून, त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. रविवारी त्याला बोरिवलीच्या सुटीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. अटकेत असलेला आयुष साहित्य ड्रग्ज विक्री प्रकरणात मुख्य आरोपी असून त्याची आणि अन्य अटक आरोपीची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे.

सुरक्षा कंपनी रडारवर 

पोलिसांकडून सुरक्षा एजन्सी असलेल्या सेफक्युअर कंपनीच्या व्यवस्थापकाकडे आता मोर्चा वळवला असून त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्याद्वारे ड्रग विक्रेत्या टोळीशी आयोजकांचे संगनमत तपासले जाईल असेही पोलिसांनी सांगितले. सामल, सैनी आणि अटक आरोपीचे कॉल रेकॉर्ड काढण्यात येत आहे. जेणेकरून त्यांचे आधीपासूनचे काही कनेक्शन आहे का? हे तपासता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Security Guard Arrested for Aiding Drug Dealers at Concert; 10 Arrested

Web Summary : A security guard was arrested for allowing drug dealers into a concert in Mumbai, accepting bribes. The guard bypassed ticketed entry. Ten people are now under arrest, including event organizers. Police are investigating possible collusion and the security agency's role.
टॅग्स :गुन्हेगारीमुंबई