खोकर ते खानापूर या आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या पाच कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी आमदार लहू कानडे यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सचिन गुजर, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्य आशा दिघे, बाबासाहेब दिघे, पंचायत समिती सदस्य वंदना मुरकुटे, अरुण नाईक, अशोक कानडे उपस्थित होते.
कानडे म्हणाले की, अकारी पडीक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण गंभीर असून, लवकरच तो मार्गी लागेल. मतदारसंघामध्ये आपण रस्त्यांच्या कामांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. तालुक्यातील एमआयडीसीच्या विकासाकरिता दळवळणाची साधने उपलब्ध करून देत आहोत. त्याचाच भाग म्हणून बाभळेश्वर फाटा ते नेवासे फाटा या १३७ कोटी रुपयांच्या महामार्गाचे काम हाती घेतले आहे; मात्र केवळ रस्ते उभारणी एवढ्यापुरतेच काम मर्यादित ठेवायचे नाही, तर सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वांगीण विकास हाती घ्यायचा आहे. कोणताही गरीब माणूस उपचारांविना राहू नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्याकरिता उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दीडशे बेडस्चे विस्तारीकरण केले जात आहे.
सूत्रसंचालन समीन बागवान यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य मंगला पवार, राजेंद्र पाऊलबुद्धे, सुधीर नवले, राम काळे, पद्मा भोसले, भाऊसाहेब कांदळकर, विजय शिंदे, विद्या दाभाडे, विष्णूपंत खंडागळे, कार्लस साठे, सरपंच सागर मुठे, लहानु दळे, आशा चक्रनारायण, दत्तात्रय आदिक उपस्थित होते.
-------
फोटो ओळी : रस्ता उद्घाटन
खोकर ते खानापूर रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर.
-------