--------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट अवतीभोवती आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वांचेच अर्थचक्र पार बिघडले आहे. त्यात दर महिन्याला महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीपाठोपाठ किराणा मालाचेही दर वाढलेले आहेत. त्यामुळे घरातले किराणा मालाचे बजेट दोन ते तीन हजार रुपयांनी वाढले आहे. एकूणच किराणाच्या खर्चात दीडपट वाढ झाली आहे.
खाद्यतेल, डाळी, मसाले यांचे दर दुप्पट झाले आहेत. चहाचे दर चारशे ते पाचशे रुपये किलो आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांचा रोजगार बुडाला, काहींना नोकरीवर पाणी सोडावे लागले. अनेक मोठे उद्योग थंडावले. त्याचा परिणाम अर्थातच सामान्यांच्या जगण्यावर झाला. त्यातच दरमहा वाढणारे दर हे एक संकटच ठरत आहे. ज्या घरात पाच ते सहा सदस्य आहेत, अशा घरांमध्ये बजेट वाढलेले आहे. जानेवारी २०२१ मधील किराणा मालाचे दर पाहिले, तर एका महिन्याचे किराणा मालाचे बजेट चार ते पाच हजार इतके व्हायचे. ते आता सात ते आठ हजारापर्यंत गेले आहे.
-------