अर्धवेळ परिचारिकांना नेमणुकीच्या गावाबाहेर काम कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:47+5:302021-07-24T04:14:47+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील अर्धवेळ परिचारिकांना अत्यल्प मानधनात काम करावे लागते. त्यांना महिनाकाठी केवळ तीन हजार रुपये मिळतात. असे असतानाही ...

How part-time nurses work outside the village | अर्धवेळ परिचारिकांना नेमणुकीच्या गावाबाहेर काम कसे

अर्धवेळ परिचारिकांना नेमणुकीच्या गावाबाहेर काम कसे

अहमदनगर : जिल्ह्यातील अर्धवेळ परिचारिकांना अत्यल्प मानधनात काम करावे लागते. त्यांना महिनाकाठी केवळ तीन हजार रुपये मिळतात. असे असतानाही अनेक परिचारिकांना त्यांची नेमणूक असलेल्या गावाऐवजी दुसऱ्या गावात पाठविण्यात येते. यात त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ गावातच नेमणूक द्यावी, अशी मागणी जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनी केली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समितीची बैठक झाली. त्यावेळी कार्ले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सभेला उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती काशीनाथ दाते, उमेश परहर, मीरा शेटे, सुनील गडाख आदींसह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. कार्ले म्हणाले, अर्धवेळ परिचारिकांना शंभर रुपये रोज मिळतो. यातही त्यांना दुसऱ्या गावात पाठविले तर तेथे जाण्यासाठी पदरमोड करावी लागते. त्यामुळे परिचारिकांना नेमणूक असणाऱ्या गावात काम द्यावे, तसेच चांगले काम करणाऱ्या अर्धवेळ परिचारिकांना शासनाने वर्ग ४ सेवेत सामावून घेण्याची मागणी कार्ले यांनी केली आहे. त्यावर याबाबत स्थायी समितीत ठराव करून शासनाला पाठविणार असल्याचे सांगण्यात आले.

नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बफर स्टॉक करून ठेवलेल्या युरियाच्या साठ्यापैकी २०५ मेट्रिक टन साठा कृषी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अन्य तालुक्यांना परस्पर वाटप केला. या प्रकाराबाबत समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, याप्रकरणी थेट कृषिमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती कार्ले यांनी दिली. नगर तालुक्यासाठी ६७६ मेट्रिक टन खतांचा बफर स्टॉक करण्याचे निर्देश कृषी उद्योग विकास मंडळाला देण्यात आले होते. मात्र, या मंडळाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर नगर तालुक्याचे युरिया खत अन्य तालुक्यांना वाटप केले. याबाबत कोणालाही कल्पना दिली नाही. ही बाब उघड झाल्यानंतर महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना स्थायी समितीच्या बैठकीला बोलाविण्यात आले होते. मात्र, हे अधिकारी बैठकीकडे फिरकले नाहीत. याप्रकरणी संनियंत्रण समितीकडे, तसेच राज्याच्या कृषिमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे कार्ले म्हणाले.

Web Title: How part-time nurses work outside the village