श्रीगोंदा : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २७ जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीवर ७१० व्यक्तींनी ६६ हरकती दाखल केलेल्या आहेत. या हरकतींची सुनावणी गुरुवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी ११.३० वाजता प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्या कार्यालयात होणार आहे.
नागवडे सहकारी साखर कारखान्याने जानेवारी २०२० मध्ये ९ हजार ५८९ व्यक्तिगत सभासदांची आणि १० संस्था सभासदांची प्रारूप यादी पात्र ठरवून प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्याकडे पाठवलेली होती. ही यादी प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी १७ जानेवारीला प्रसिद्ध करून त्यावर २७ जानेवारीपर्यंत हरकती व आक्षेप मागविले होते. कोविडमुळे गेली वर्षभर निवडणूक प्रक्रिया सुनावणीच्या टप्प्यावर थांबलेली होती.
नागवडे साखर कारखान्याच्या ३३ सभासद संस्थांनी प्रारूप यादीवर ८ हरकती नोंदविलेल्या आहेत. तर ६७० व्यक्तिगत सभासदांनी ५८ हरकती नोंदविलेल्या आहेत. एकूण ६६ हरकतींची सुनावणी गुरुवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी ११.३० वाजता होणार आहे.