गुटखा, गांजा, दारू मिळते, पण रेमडेसिविर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:01+5:302021-04-16T04:20:01+5:30
संगमनेर तालुक्यातील २६७ जणांना गुरुवारी (दि. १५) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना ‘बेक्र द ...

गुटखा, गांजा, दारू मिळते, पण रेमडेसिविर मिळेना
संगमनेर तालुक्यातील २६७ जणांना गुरुवारी (दि. १५) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना ‘बेक्र द चेन’च्या माध्यमातून राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले. एवढ्या कडक निर्बंधातही संगमनेर शहर व तालुक्यात बंदी असलेला गुटखा, अमली पदार्थांमध्ये समावेश असलेला गांजा सर्रास विकला जातो आहे. बिअर बार, परमिट रूम, वाईन शाॅप बंद असल्याने देशी-विदेशी मद्याची अवैधरीत्या विक्री होते आहे; परंतु गरज असलेले रेमडेसिविर व इतर इंजेक्शन रुग्णालयातील मेडिकल अथवा बाहेरील मेडिकलमध्ये उपलब्ध होत नाहीत. रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची गरज असल्यास त्याच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले; परंतु तरीही काही ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते आहे. डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी, रुग्णाचे आधारकार्ड घेऊन इंजेक्शन कुठे मिळेल? या शोधात नातेवाइकांची धावधाव सुरू असून, तरीही इंजेक्शन उपलब्ध होत नाही.
--------
बड्या शहरांतील रुग्णांवर संगमनेरात उपचार
कोरोनाग्रस्त संगमनेरातील रुग्ण पूर्वी मुंबई, पुणे, नाशिक या बड्या शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी जायचे; परंतु येथील रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत. या शहरांमधील रुग्णांचे नातेवाईक संगमनेरात बेड शिल्लक आहे का? याची चौकशी करत आहेत. बाहेरगावातील अनेक जण संगमनेरातील रुग्णालयांमध्ये कोराेनाचे उपचार घेत आहेत.
-------------
ज्यादा पैसे देण्याची तयारी
एका व्यापाऱ्याचे वडील संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत आहेत. या व्यापाऱ्याला संबंधित रुग्णालयाच्या संचालक डॉक्टरांनी तुमच्या वडिलांना रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे लागेल, ते बाहेरून आणा, असे सांगितले; मात्र अद्यापही त्या व्यापाऱ्याला रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झालेले नाही. ज्यादा पैसे देऊनही अनेक रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन विकत घ्यायला तयार आहेत.