लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : येथील रामवाडीसाठी असलेल्या सर्जेपुरा येथील स्वस्त धान्य दुकाने शुक्रवारी सुरू करण्यात आली असून, या भागातील नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमतने गुरुवारच्या अंकात 'झोपडपट्टीत उपाशीपोटी लढा, ना लस ना रेशन' या मथळ्याखाली रामवाडी भागातील ग्राऊंड रिपोर्ट मांडला होता. या वृत्ताने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा प्रशासनाने या भागातील स्वस्त धान्य दुकानदारांचे चांगलेच कान उपटले. त्यामुळे दुकानदारांनी शुक्रवारी स्वस्त धान्य दुकाने सुरू करत शासनाच्या नवीन नियमानुसार नागिरकांना धान्य वाटप करण्यास सुरुवात केली. या भागातील नागिरकांनीही नियमांचे पालन करत दुकानांसमोर रांगा लावल्या. गेल्या पंधरा दिवसांपासून स्वस्त धान्य दुकाने बंद हाेती. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांकडून दुकाने सुरू करण्याची मागणी हाेत होती. परंतु, दुकानदारांनी दुकाने उघडली नाहीत. प्रशासनाच्या आदेशानंतर दुकाने सुरू करण्यात आली असून, धान्याचे नियमित वाटप सुरू करण्यात आले आहे.
.....
- रामवाडी झाेपडपट्टीतील कार्डधारकांची नावे सर्जेपुरा येथील स्वस्त धान्य दुकानांना जोडण्यात आलेली आहे. ही दुकाने बंद होती. वेळोवेळी पाठपुरावा करून दुकाने सुरू होत नव्हती. लोकमतने दिलेल्या वृत्तानंतर या भागातील दुकाने शुक्रवारी सुरू झाली असून, नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले आहे.
- विकास उडाणशिवे, सामाजिक कार्यकर्ते, रामवाडी
.....
१४ रामवाडी