Join us
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 07:31 IST

मृतदेह घरी येताच नातेवाइकांच्या किंचाळ्या, एकाच घरातील चार जणांच्या अशा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

मुंबई - पायधुनीतील घाटी मोहल्ल्यातील डोकाडिया कुटुंबाचे कालपर्यंत हसण्या-बोलण्याने, गप्पागोष्टींनी आणि आपुलकीने भरलेले घर आज पूर्णपणे ओस पडले आहे. घराच्या दाराशी फक्त चपलांचा खच उरलेला दिसून आला.  आत गेल्यावर स्वयंपाकघरात अजूनही कालच्या रात्रीचे चित्र जसेच्या तसे दिसते. अर्धवट राहिलेली बिर्याणी, कापलेले कलिंगड पडलेले दिसून आले.  

सोमवारी चौघांचे मृतदेह त्यांच्या घरी आणले. नातेवाइकांच्या किंकाळीने परिसर हादरला. चौघांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यानंतर घरात एक भीषण शांतता दिसून आली. घाटी मोहल्ल्यात दुसऱ्या मजल्यावर राहणारे कुटुंब नेहमीच आनंदात असायचे. चारही जणांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, अब्दुला आणि आयेशाचा मृत्यूपूर्वी पोलिसांनी जबाब नोंदवला. तेव्हा, अब्दुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीत, रात्री एकत्र जेवण केले. भाऊ निघून गेल्यानंतर आम्ही रात्री उशिराने कलिंगड खाऊन झोपी गेलो. त्यानंतर सकाळी त्रास सुरू झाला. मात्र, त्याव्यतिरिक्त काहीही खाल्ले नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार, तपास सुरू असतानाच उपचादरम्यान यांचाही मृत्यू झाला.  या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले. 

शेजाऱ्यांकडून हळहळ एकाच घरातील चार जणांच्या अशा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अब्दुला यांचा नेहमी काम आणि घर असा दिनक्रम असायचा. कुटुंबीय नेहमी आनंदात असायचे, असे शेजारच्यांनी सांगितले. सोमवारी त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी घरातील स्मशानशांततेत त्यांच्या चपलांचा खच पडलेला दिसून आला.

पायधुनीतील हादरून टाकणारा घटनाक्रम 

२५ एप्रिल रात्री १०:३० : एकत्र जेवणाची दावत२६ एप्रिल रात्री १ वाजता : कलिंगड खाल्लेपहाटे ५:३० पासून : उलट्या-जुलाब सुरू सकाळी ९:३० : चारही जणांना जुलाब आणि उलट्या चालूसकाळी ९:३० : घरातली लहान मुलगी जैनबचा मृत्यू दुपारी १:३० : नसरीनचा मृत्यू दुपारी ४:३० : आयेशाचा मृत्यू रात्री १०:३० वाजता : अब्दुलाचा मृत्यू

लग्नाचे निमंत्रण दिले अन्...

शेजारी राहणारे जब्बार शेख यांनी सांगितले, मुलीच्या लग्नासाठी आठवडाभर बाहेर होतो. जाण्यापूर्वी त्यांना मुलीच्या लग्नाचे निमंत्रणही दिले होते. ते नेहमी भेटल्यानंतर सलाम करायचे, झण्यापूर्वीही एकदा सलाम केले. मात्र, घरी परतल्यानंतर त्यांच्या निधनाचे समजताच धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. खूप चांगले शेजारी होते. कधी कुणाशी वाद नाही. नेहमी हसत-खेळत असायचे, असेही त्यांनी सांगितले.

ऑनलाइन ऑर्डर?डोकडिया कुटुंबीयांनी खाल्लेल्या कलिंगडाबाबतही दोन दावे समोर आले आहे. त्यांनी ते ऑनलाइन मागवले होते, अशीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे. तर, ते नेहमी नळबाजार मार्केटमधूनच खरेदी करायचे. तर, घरातील कलिंगड चार दिवसांपूर्वीचे असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. 

काही दिवस कलिंगड विक्री बंदकलिंगडामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताने येथील नळबाजार फ्रूट मार्केटसह आजूबाजूच्या बाजारातून कलिंगड गायब झाल्याचे दिसून आले. तसेच, प्रत्येकाने कलिंगडचा धसका घेतला. बाजारात फक्त आंबेच दिसून आले. ज्यांनी कलिंगडचे दुकान लावले, त्यांनाही बंद करण्यास सांगण्यात आले. नळबाजार फ्रुट अँड व्हेजिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष अली अहमद कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांमधील भीती पाहता काही दिवस कलिंगड न विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Family Dies After Eating Watermelon; Panic Grips Market

Web Summary : A Mumbai family of four died after suspected food poisoning from watermelon. The incident triggered panic; watermelon sales halted in Nalbazar market. Police investigate.