Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 07:11 IST

जास्त लांब जाऊ नये म्हणून वडिलांनी फक्त २०० रुपये पाठवले, अपघातात तीन कुटुंब उद्ध्वस्त

मनीषा म्हात्रे  मुंबई - वाढदिवसानिमित्त मित्रांसोबत सेलिब्रेशन करण्यासाठी घराबाहेर पडलेला कृष्णा देसाई रात्र झाली तरी आला नाही, म्हणून वडिलांनी व्हिडीओ कॉल केला. ‘पप्पा, मी लवकरच घरी येतोय...’ रात्री उशिरा मुलाचे हे बोलणे ऐकून वडिलांनी निर्धास्तपणे डोळे मिटले. इतकंच नाही, तर शेजाऱ्यांनाही सांगून त्याच्या बाइकसाठी पार्किंगची जागा राखून ठेवली. पण, सकाळी उघडलेल्या डोळ्यांसमोर वास्तव मात्र असह्य होते. पेट्रोल संपले म्हणून वडिलांकडून पैसेही मागितले. मुलगा जास्त लांब जाऊ नये, म्हणून त्यांनी फक्त २०० रुपये त्याला पाठवले. त्यानंतर सकाळी थेट त्याच्या अपघाताचा कॉल कुटुंबीयांना आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 

म्हाडा कॉलनीत राहणारा कृष्णा देसाई, नुकताच दहावी उत्तीर्ण झालेला. आयुष्याच्या नव्या टप्प्याची स्वप्नं पाहत होता.  शनिवारी रात्री १२ वाजता कुटुंबीयांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याचे वडील उदय देसाई शिपिंग अँड लॉजिस्टिकचा व्यवसाय करतात. वाढदिवसाच्या दिवशी मित्रांसोबत सेलिब्रेशनसाठी तो सायंकाळी घराबाहेर पडला. रात्र झाली तरी तो घरी परतला नाही, म्हणून साडेअकरा वाजता वडिलांनी त्याला व्हिडीओ कॉल केला, तेव्हा तो मुलुंडमध्येच होता. रात्री उशिरा वडिलांशी झालेल्या व्हिडीओ कॉलमध्ये तो हसत-खेळत बोलला. पेट्रोल संपलंय, असं सांगत त्याने थोडे पैसे मागितले. तसेच, लवकरच घरी  येतोय, असे सांगितले. वडिलांनी काळजीपोटी तो जास्त दूर जाऊ नये, म्हणून फक्त २०० रुपये पाठविले हाेते.  

बाईकसाठी राखून ठेवली जागा देसाई यांनी सांगितले, तो घरी येतोय म्हणाला म्हणून झोपण्यापूर्वी शेजारच्या बंगल्यावाल्यांनाही मुलगा येतोय, तर त्याच्या दुचाकीसाठी जागा राखून ठेवली. नंतर मीही  झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर त्याला कॉल केला, तर फोन बंद लागला. मित्रांकडे चौकशी केली, तर तो रात्रीच घरी निघाल्याचे समजले. तो कुठे आहे? याचा शोध सुरू असताना नवघर पोलिसांनी अपघाताची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा अपघाती मृत्यू झाला, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे सांगताच त्यांना अश्रू अनावर झाले. कृष्णाला ब्लॉगिंग करायला आवडायचे. तो कालच म्हणत होता, बाबा, माझे फॉलोवर्स का नाही वाढत आहे. आज त्याच्या मृत्यूनंतर फॉलोवर्स वाढताहेत. मात्र, ते बघण्यासाठी तोच नाही, असेही ते म्हणाले. 

अन् ती भीती खरी ठरली... मुस्कानचे दहावी शिक्षण झाले असून, गेल्या दोन महिन्यांपासून ती टेलिकॉलिंग कंपनीत नोकरीला लागली होती. वडील टॅक्सीचालक आहेत. स्वतःच्या मोबाइलसह वडिलांचा मोबाइल, गाडी घेऊन ती गेली. पहाटे ४ वाजता मावशीच्या मुलींनाही फिरायला येते का, म्हणून विचारले. मात्र, तिने आई ओरडेल म्हणून नकार दिला. बराच वेळ झाला तरी मुस्कान घरी आली नाही, म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. कुठे काही अपघात झाला का? या दिशेने शोध घेत मरीन ड्राइव्ह परिसरात पोहोचले. तेथे अपघाताची माहिती मिळाली. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. तिला सकाळीच अडवले असते, तर आमची मुलगी वाचली असती, असे तिची मावशी मुस्कान खान यांनी सांगितले. 

मॉर्निंग वॉक जिवावर गिरगावच्या क्रांतीनगरमध्ये पत्नीसोबत राहणारे किशोर लामने हे एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते. त्यांचा मुलगा मिरा रोडला राहतो. ते नेहमी मॉर्निंग वॉकसाठी मरीन ड्राइव्ह परिसरात येतात. सोमवारी ते नेहमीप्रमाणे वॉकसाठी आले. रस्ता क्रॉस करताना अपघातात मृत्यू झाला. ते सगळ्यांचेच खूप जवळचे होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसल्याचे त्यांचे चुलत भाऊ  शिवाजी राहणे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Last video call: 'Dad, I'm coming,' he said, but never did.

Web Summary : Krushna Desai, celebrating his birthday, assured his father he was coming home. He asked for petrol money but tragically died in an accident. Similarly, Muskan and Kishore Lamne lost their lives, highlighting unforeseen tragedies.
टॅग्स :अपघात