Join us
Daily Top 2Weekly Top 5

परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 05:54 IST

आता उरले शेवटचे २ दिवस, १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली तर लॉटरी जून महिन्यात निघेल.

मुंबई - ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाच्या परवडणाऱ्या २ हजार ६४० घरांसाठी २७ एप्रिलपर्यंत ४५ हजार ८१० अर्ज आले असून यापैकी २९ हजार ६१० अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. एव्हाना म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज येतात. मात्र, यावर्षीच्या लॉटरीमधील घरांसाठी आलेल्या अर्जांची संख्या पाहता तूर्तास तरी मुंबईकरांनी अवाच्या सव्वा दर असणाऱ्या घरांकडे पाठ फिरवल्याची चर्चा म्हाडाच्याच मुख्यालयात रंगली आहे. 

पहाडी गोरेगाव येथे असलेल्या अत्यल्प गटातील घरांची किंमत ३२ लाख ३६ हजारांवर आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेमधील आहेत. विक्रोळी, वडाळा, पवई आणि मानखुर्द येथे अत्यल्प गटातील घरे आहेत.  विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबुर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, पवई, दादर, गोरेगाव, वडाळा येथील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये विविध उत्पन्न गटासाठी सदनिका आहेत. मात्र, या घरांच्या किमती अवाच्या सव्वा आहेत. 

दरम्यान, कमी संख्येने आलेले अर्ज लक्षात घेता कदाचित म्हाडाकडून अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता असली तरी मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिलेला नाही. १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली तर लॉटरी जून महिन्यात निघेल.

१५ मे रोजी लाॅटरीऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २९ एप्रिल असून ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम स्वीकारली जाईल.सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी ५ मे रोजी प्रसिद्ध होईल.दावे व हरकती दाखल करण्यासाठी ८ मेपर्यंत मुदत आहे. तर १२ मे रोजी अंतिम यादी प्रसिद्धी होईल. घरांची लाॅटरी १५ मे रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai MHADA Lottery: Fewer applicants signal unaffordable housing crisis.

Web Summary : MHADA's Mumbai lottery sees fewer applicants for 2,640 homes, with 45,810 applications received. High prices in areas like Goregaon deter buyers. Extension possible; lottery on May 15.
टॅग्स :म्हाडा लॉटरी