मुलींनीच रचला अपहरणाचा बनाव

By Admin | Updated: September 21, 2014 23:48 IST2014-09-21T23:41:15+5:302014-09-21T23:48:51+5:30

अकोले : ‘आपले अपहरण झाले होते’ असा बनाव रचणाऱ्या मुलींनीच अपहरण झाले नाही अशी कबुली दिल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

The girls have created a kidnapping | मुलींनीच रचला अपहरणाचा बनाव

मुलींनीच रचला अपहरणाचा बनाव

अकोले : ‘आपले अपहरण झाले होते’ असा बनाव रचणाऱ्या मुलींनीच अपहरण झाले नाही अशी कबुली दिल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी केले.
शनिवारी रात्री गर्दणीच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीने आपले व आपल्या सहावीत शिकणाऱ्या मामेबहिणीचे अपहरण झाले, प्रसंगावधान साधून आम्ही पळालो, अशी फिर्याद दिल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. या मुली शुक्रवारी सकाळी शाळेत येत असताना रस्त्यात पिवळ्या जीपमधून आलेल्या काही जणांनी आपले अपहरण केले. आपणास गुंगीचे औषध दिले. सायंकाळी डोंगरगाव शिवारात आमची गुंगी उतरली असता अपहरणकर्त्यांची नजर चुकवून आपण सुटका करुन घेतली. तेथील लोकांच्या मदतीने घरी संपर्क साधला व मामाच्या मदतीने तक्रार दिली, अशी फिर्याद काल या मुलींनी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी वेगात तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी जावून चौकशी केली.
सहावीतील मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा अपहरण झालेच नाही ही बाब पुढे आली. दहावीत शिकणारी मुलगी मामाकडे राहत असून तिचे मूळ गाव सिन्नर आहे. आई-वडिलांची आठवण आल्यामुळे तिला सिन्नरला जायचे होते. ती व तिची मामे बहीण काल शाळेत न जाता थेट सिन्नरच्या दिशेने निघाल्या. सायंकाळी त्या डोंगरगाव शिवारात एका वस्तीवर पोहचल्या. परंतु अंधार पडल्याने पुढे जाणे शक्य नव्हते. घरी गेले तर जाब विचारला जाईल, या भीतीमुळे त्यांनी अपहरणाचा बनाव रचला.
मात्र हा बनाव पोलिसांपुढे फार काळ टिकला नाही. रविवारी दिवसभर अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या चर्चेने तालुका ढवळून निघाला.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The girls have created a kidnapping