कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रात या व्हेरिएंटचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्याच अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने डेल्टा प्लसच्या संशयितांचे जिल्ह्यातून काही नमुने १७ जुलै २०२१ रोजी पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल तब्बल महिन्यानंतर मंगळवारी (दि. २४) जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला. त्यात पारनेर शहर व पारनेर तालुक्यातील कळस येथे प्रत्येकी एक, तसेच पाथर्डी तालुक्यातील मंगरूळ येथे एक व श्रीगोंदा शहरात एक असे चार जणांचे डेल्टा प्लसचे अहवाल पाॅझिटिव्ह आढळले.
दरम्यान, हे रुग्ण बरे झाल्याने त्यांना पूर्वीच घरी सोडण्यात आलेले असून ते ठणठणीत आहेत. आता त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पोखरणा यांनी दिली.