Jewellery Stocks Fall: लग्नसराईचा हंगाम जोरात असतानाच आज शेअर बाजारात ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स ९ ते १० टक्क्यांपर्यंत खाली आले. देशातील परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधानांनी हे पाऊल उचललं आहे. भारत हा जगातील सोन्याचा दुसरा मोठा ग्राहक असून, गेल्या आर्थिक वर्षात भारतानं दरमहा सुमारे ६ अब्ज डॉलर्स किमतीच्या ६० टन सोन्याची आयात केली होती.
प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सची स्थिती
पंतप्रधानांच्या या विधानाचा सर्वाधिक फटका सेनको गोल्डला बसला असून, या कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी घसरून ३२५.२५ रुपयांवर आला. कल्याण ज्वेलर्सच्या शेअरमध्येही ९ टक्क्यांहून अधिक घट झाली असून, व्यवहारादरम्यान तो ३८२.२० रुपयांपर्यंत खाली आला होता. टाटा समूहाची दिग्गज कंपनी टायटनच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांची घसरण झाली आणि तो ४,१५१.४० रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
सोन्याच्या आयातीवर वाढता दबाव
सध्या देशातील सोन्याच्या आयातीवर आधीच दबाव असल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यात सोन्याची आयात केवळ १५ टन राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, जी गेल्या तीन दशकांतील नीचांकी पातळी असेल. सरकारनं बँकांकडून ३ टक्के 'एकीकृत वस्तू आणि सेवा कर' (IGST) वसूल करण्यास सुरुवात केल्यामुळे बँकांनी सोन्याची आयात थांबवली आहे, हे याचं मुख्य कारण मानलं जात आहे.
दमदार तिमाही निकाल, तरी शेअर्समध्ये घसरण
विशेष म्हणजे, या कंपन्यांनी मार्च तिमाहीत अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे, तरीही बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे शेअर्स घसरले आहेत.
टायटन : कंपनीचा निव्वळ नफा ३५ टक्क्यांनी वाढून १,१७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच कंपनीची कमाई ४६ टक्क्यांच्या वाढीसह २०,३०० कोटी रुपये झाली आहे.
कल्याण ज्वेलर्स : कंपनीच्या निव्वळ नफ्यात ११८.२ टक्क्यांची जबरदस्त वाढ होऊन तो ४०९.५ कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा महसूलही ६६.२ टक्क्यांच्या वाढीसह १०,२७४.९ कोटी रुपयांवर पोहोचलाय.
एकीकडे कंपन्यांची आर्थिक कामगिरी उजवी असताना, दुसरीकडे सरकारी धोरण आणि पंतप्रधानांच्या आवाहनामुळे ज्वेलरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कागमिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Jewellery stocks fell sharply after PM Modi urged citizens to avoid gold purchases for a year to conserve foreign exchange. Titan, Senco Gold, and Kalyan Jewellers saw significant drops despite strong quarterly results. Banks halting gold imports also contributed to the decline.
Web Summary : पीएम मोदी द्वारा एक वर्ष तक सोना खरीदने से बचने के आग्रह के बाद ज्वेलरी शेयरों में भारी गिरावट आई। मजबूत तिमाही नतीजों के बावजूद टाइटन, सेंको गोल्ड और कल्याण ज्वेलर्स में उल्लेखनीय गिरावट देखी गई। बैंकों द्वारा सोना आयात रोकने से भी गिरावट आई।