अखेर मिरी-तिसगाव योजनेची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:14+5:302021-07-26T04:21:14+5:30
करंजी : पाथर्डी तालुक्याच्या मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी योजनेची करंजीजवळ पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे रविवारी (दि.२५) ‘लोकमत’च्या ...

अखेर मिरी-तिसगाव योजनेची दुरुस्ती
करंजी : पाथर्डी तालुक्याच्या मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी योजनेची करंजीजवळ पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे रविवारी (दि.२५) ‘लोकमत’च्या अंकात प्रसिद्ध होताच या योजनेची तातडीने दुरुस्ती करण्यात आली.
करंजीसह दगडवाडी, भोसे, वैजूबाभूळगाव, खांडगाव, शिराळ, चिचोंडी परिसरात अत्यंत कमी पाऊस झाल्याने या भागात ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. या भागातील काही गावांना वरदान ठरलेली मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. सकाळी अचानक करंजीजवळील बेलओढ्यातील कैलास शिंदे या शेतकऱ्याच्या घराजवळ या योजनेची पाईपलाईन फुटून या भागातील काही गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच फुटलेल्या पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करण्यात येऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याची माहिती या योजनेचे सुपरवायझर नितीन काचुळे यांनी दिली. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने या गावातील नागरिकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.