औषध आहे असे सांगून बापाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:39+5:302021-07-27T04:22:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राहुरी (जि. अहमदनगर) : जन्मदात्या बापाने लहान्या मुलाच्या मदतीने मोठ्या मुलाला जबरदस्तीने विष पाजून जिवे मारण्याचा ...

The father said that there is medicine | औषध आहे असे सांगून बापाने

औषध आहे असे सांगून बापाने

लोकमत न्यूज नेटवर्क

राहुरी (जि. अहमदनगर) : जन्मदात्या बापाने लहान्या मुलाच्या मदतीने मोठ्या मुलाला जबरदस्तीने विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे पिता-पुत्राच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना ९ जुलै रोजी घडली. याप्रकरणी रविवारी (दि. २५) राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश बाळासाहेब म्हसे (वय ३५) याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, ९ जुलै रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान तो त्याच्या घरात अंथरुणावर झोपलेला होता. त्यावेळी त्याचे वडील आरोपी बाळासाहेब रावसाहेब म्हसे व भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे हे दोघे आले. त्यांनी तुझे दुखणे बरे आहे का, तू जेवण केले का, असे विचारत तुझ्यासाठी औषध आणले आहे. हे घे. मग तुला बरे वाटेल, असे सांगितले. घासावर फवारणीसाठी आणलेल्या कीटकनाशकाची बाटली गणेश याने वडिलांच्या हातात पाहिली. त्याने ते पिण्यास नकार दिला. त्यामुळे गणेश याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे याने गणेशला पाठीमागून दाबून धरले. वडील बाळासाहेब रावसाहेब म्हसे याने त्याच्या हातातील कीटकनाशक गणेशच्या तोंडात ओतले. गणेश त्यांना विरोध करत होता. परंतु आरोपींनी त्याला संगनमत करून बळजबरीने औषध पाजून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

गणेश म्हसे याच्या फिर्यादीवरून २५ जुलै रोजी राहुरी पोलिसात आरोपी बाळासाहेब रावसाहेब म्हसे व ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे (दोघे रा. कोंढवड, ता. राहुरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

................

मरणाच्या दारातून गणेशची सुटका

९ जुलै रोजी गणेश याला विष पाजून मारण्याचा प्रयत्न त्याचा बाप आणि भाऊ यांनी केला होता. यात गणेश बेशुद्ध पडला होता. नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात दाखल केले. तेव्हापासून २५ जुलैपर्यंत गणेशवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी गणेशला बरे वाटू लागल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला. त्याच्या जबाबात ही धक्कादायक बाब उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

Web Title: The father said that there is medicine